बंदीतही चाऱ्याची परजिल्ह्यात वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:57 IST2019-01-28T14:56:46+5:302019-01-28T14:57:03+5:30
शेलुबाजार : सन २०१८ या वर्षात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने चाराटंचाई निर्माण होत आहे. जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली असतानाही जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात आहे.

बंदीतही चाऱ्याची परजिल्ह्यात वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार : सन २०१८ या वर्षात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्याने चाराटंचाई निर्माण होत आहे. जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली असतानाही जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेला जात आहे.
शेलुबाजार परिसरात ४० हजाराच्या आसपास पशूधन असून गतवर्षीच्या कमी पावसामुळे चाराटंचाईचे सावट पशुपालकांसमोर उभे ठाकले आहे. संभाव्य चाराटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील प्रकल्पाच्या गाळपेर जमिनीवर २८५० हेक्टर क्षेत्रात ज्वारी, मका, बाजरी या चारा पिकांच्या पेरणीची तयारी केली आहे. यासाठी शेतकºयांना मोफत बियाणे देण्यात येणार आहे. मात्र, पाण्याअभावी सदर नियोजन यशस्वी होईल का? हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर्षी जिल्ह्यात चारा टंचाई असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील चारा परजिल्ह्यात नेण्यावर बंदी आणली आहे. याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. तथापि, जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी शेलुबाजार परिसरात होत नसल्याचे दिसून येते. शेलुबाजार परिसरातून सर्रास चारा वाहतूक अन्य जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.