घरफोडीचे पाच गुन्हे उघड; आरोपी जेरबंद, १.२७ लाखांचा ऐवज जप्त
By दिनेश पठाडे | Updated: July 28, 2023 18:45 IST2023-07-28T18:45:27+5:302023-07-28T18:45:33+5:30
कारंजा शहर पोलिसांच्या हद्दीत गत महिनाभरात ०५ वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व चोरीसारखे गुन्हे घडले होते.

घरफोडीचे पाच गुन्हे उघड; आरोपी जेरबंद, १.२७ लाखांचा ऐवज जप्त
वाशिम : कारंजा शहर पोलिसांच्या हद्दीत गत महिनाभरात ०५ वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व चोरीसारखे गुन्हे घडले होते. त्याप्रकरणी पो.स्टे.कारंजा शहर येथे कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि तसेच कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हे नोंदविण्यात आले होते. या गुन्ह्यातील एकूण ०५ आरोपींना अटक करून त्यांचेकडून सर्व प्रकरणातील तब्बल १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात कारंजा शहर पोलिसांना यश आले.
शहरांतर्गत घडलेल्या चोरी, घरफोडीच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी कारंजा शहर पोलिसांनी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दाखल गुन्ह्यात पवन राजू चव्हाण, (रा.चांधई, ता. मंगरूळपीर, जि.वाशिम ह.मु.शिंदे नगर, कारंजा,) शिवा रमेश चव्हाण, नितेश रमेश गिरी दोघे (रा.तुळजाभवानी नगर, कारंजा,) भावेश घनसिंग घनघोल, (रा.रविदास नगर, कारंजा) व अजय साधुराम रामधानी (रा.दाईपुरा, कारंजा) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी उपरोक्त गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाई व तपास सुरु आहे.