पाच वर्षांत प्रथमच जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:27+5:302021-03-13T05:15:27+5:30
शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. ती मोजण्यासाठी जिल्ह्यातील ...

पाच वर्षांत प्रथमच जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ
शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे महिन्यात भूजल पातळी मोजली जाते. ती मोजण्यासाठी जिल्ह्यातील ७९ सर्वेक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. जानेवारीच्या अखेर या विहिरींतील पातळीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात वाशिम तालुक्यातील ११ विहिरींची पातळी ६.१७ मीटर, मालेगाव तालुक्यातील ८ विहिरींची ५.६० मीटर, रिसोड तालुक्यातील १८ विहिरींची पातळी ६.९३ मीटर, मंगरुळपीर तालुक्यातील ११ विहिरींची पातळी ६.२५ मीटर, मानोरा तालुक्यातील १५ विहिरींची पातळी ५.१७ मीटर, तर कारंजा तालुक्यातील १६ विहिरींची पातळी ५.५३ मीटर नोंदविण्यात आली. गतवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरच जिल्ह्यातील ७९ विहिरींची सरासरी पातळी ६.४८ मीटरपर्यंत खालावली होती; परंतु गतवर्षीच्या अर्थात २०२० च्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडल्याने जिल्ह्याच्या भूजल पातळीत ०.३७ मीटरची सुधारणा होऊन यंदा जानेवारीच्या अखेर या विहिरींची सरासरी पातळी अर्थातच जिल्ह्याची भूजल पातळी ६.११ मिटर नोंदविण्यात आली.
---------------
पातळी सुधारण्यास अद्यापही वाव
जिल्ह्याची भूजल पातळी २०१९ मध्ये १.१२ मीटरने, तर २०१८ मध्ये १.७६ मीटरने खालावली होती. जिल्ह्याचा भूस्तर बेसाल्ट खडकाने व्यापला असल्याने पावसाचे फारसे पाणी भूगर्भात झिरपत नाही. त्यात अपुरा पाऊस, कूपनलिकांचे वाढते प्रमाण, नैसर्गिक जलस्रोतावर होणारे अतिक्रमण आणि बांधकामे, तसेच जलपुनर्भरण अंमलबजावणीत होणारी कसर आदी कारणांमुळे भूजल पातळीवर परिणाम होतो. गतवर्षी दमदार पाऊस पडल्याने भूजल पातळीत सुधारणा झाली असली तरी उपरोक्त उपायांच्या अभावामुळे भूजल पातळी आणखी सुधारण्यास वाव असल्याचेही दिसत आहे.
-----------
दोन वर्षांतील तालुकानिहाय भूजल पातळी
तालुका - २०२० - २०२१ - झालेली वाढ
वाशिम - ६.४७ - ६.१७ - ०.३०
मालेगाव - ६.०० - ५.६० - ०.४०
रिसोड - ७.३० - ६.९३ - ०.३७
मं. पीर - ६.६६ - ६.२५ - ०.४१
मानोरा - ५.५२ - ५.१७ - ०.३५
कारंजा - ६.९० - ६.५३ - ०.४१
-----------
मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक वाढ
वाशिम जिल्ह्याच्या ७९ सर्वेक्षण विहिरींच्या सर्वेक्षणानुसार भूजल पातळीत गत पाच वर्षांत प्रथमच ०.३७ मीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यातील भूजल पातळीत सर्वाधिक ०.४१ मीटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. सन २०१३ ते २०१८ या पाच वर्षांच्या तुलनेत २०१८ मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील भूजल पातळी १.५३ मीटरने, तर २०१९ मध्ये ०.६६ मीटरने घटली होती. गतवर्षी मंगरुळपीर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३३ टक्के पाऊस पडला. त्याचा परिणाम होऊन भूजल पातळीत सुधारणा झाली आहे.
------------
कोट: जिल्ह्यातील ७९ सर्वेक्षण विहिरींचे सर्वेक्षण जानेवारी अखेर करण्यात आले. त्यात गत पाच वर्षांच्या तुलनेत प्रथमच जिल्ह्याच्या भूजल पातळीत सुधारणा झाली आहे. विहिरींच्या सर्वेक्षणातील नोंदीनुसार जिल्ह्याच्या भूजल पातळीत ०.३७ मीटरची वाढ झाल्याचे दिसत आहे. गतवर्षीच्या दमदार पावसासह जलसंधारणाची झालेली कामे यामुळे पातळीवर चांगला परिणाम झाला आहे. तथापि, भूजल पातळी सुधारण्यास अद्यापही खूप वाव आहे
- सुनील कडू,
वरिष्ठ भूवैज्ञानिक,
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, वाशिम