दोन ठिकाणी शासकीय कार्यालयांना आग
By Admin | Updated: April 24, 2017 02:20 IST2017-04-24T02:20:51+5:302017-04-24T02:20:51+5:30
कारंजा येथे वन विभाग, तर आसोला येथे शाळेचा समावेश : लाखोंचे नुकसान

दोन ठिकाणी शासकीय कार्यालयांना आग
वाशिम: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाला आग लागल्याची घटना रविवार, २३ एप्रिल रोजी घडली. कारंजा येथे वन विभागाच्या कार्यालयातील संगणकासह दस्ताऐवज जळून खाक झाले, तर आसोला येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला व लागूनच असलेल्या गोठ्याला आग लागली.
कारंजा लाड : येथील मंगरुळवेश जवळील वन विभागाच्या कार्यालयाला आग लागून त्या आगीत वन विभागाच्या कार्यालयातील संगणकासह दस्ताऐवज जळून खाक झाले.
रविवारी सुट्टी असल्याने कार्यालयात कोणीही हजर नसताना संगणकाच्या खोलीतून धूर येत असल्याचे महिला वन कर्मचाऱ्याचे पती शरद मोकरणे यांच्या लक्षात आले. त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तशी माहिती देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीमध्ये दोन संगणक संच, दोन स्कॅनर, एक कलर प्रिंटर, एक दूरध्वनी संच, दोन सिलिंग फॅन व फर्निचर जळून खाक झाले. कारंजा वन विभाग कार्यालयाच्या चार खोल्यात ही आग लागली. यामध्ये वन गुन्हे प्रकरणे, कॅशबुक, गुन्हे नोंदवही, आवक जावक रजिस्टर, वन्य प्राणी हल्ला नुकसान प्रकरणे, हरित सेना नोंदणी फॉर्म, असे दस्ताऐवजसुद्धा जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार संगणक खोलीतील शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, वाशिम येथील अधिकारी आर.बी. गवई, यांनी घटनास्थळाला भेट दिली. या आगीसंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलीस, लाईनमन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्याचे साहित्य उपलब्ध असूनदेखील आगीच्या रुद्रावतारामुळे त्या साहित्यापर्यंत पोहोचता आले नाही, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. डोंगरे यांनी दिली.
मोप : रिसोड तालुक्यातील आसोला येथे जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला आग लागली व त्या शेजारील गोठासुद्धा जळून खाक झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्याने प्राणीहानी टळली.
मारोतीच्या पाराजवळ जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत असून त्यालगत गावकऱ्यांचे गोठे आहेत. २३ एप्रिल रोजी अचानक आग लागली.
गावकऱ्यांच्या सतर्कतेने गोठ्यातील जनावरांना सोडल्याने प्राणहानी टळली. आग गावात पसरु नये म्हणून उपाययोजना केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी गावात दाखल झाली व आग विझविण्यात आली. शाळेची इमारत व नारायण पाचरणे यांचा जनावरांचा गोठा जळून खाक झाला. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याची व्यवस्था व प्रयत्न केले.