जिल्ह्यात आठ हजारांवर बांधकाम कामगारांना आर्थिक मदत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:38+5:302021-03-13T05:15:38+5:30
जिल्ह्यात १९ हजार ४४५ नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. त्यातील नोंदीत जीवित कामगारांची संख्या १०८३ असून ३३५७ कामगारांनी नूतनीकरण केलेले ...

जिल्ह्यात आठ हजारांवर बांधकाम कामगारांना आर्थिक मदत!
जिल्ह्यात १९ हजार ४४५ नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. त्यातील नोंदीत जीवित कामगारांची संख्या १०८३ असून ३३५७ कामगारांनी नूतनीकरण केलेले आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात शासनाकडून दोन टप्प्यांत प्रत्येकी २ हजार व ३ हजार रुपये मदत देण्यात आली. त्यास ८ हजार २८ बांधकाम कामगार पात्र ठरले. संबंधितांच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. सरकारी बांधकाम अधिकारी कार्यालयाकडून मदतीसंदर्भातील एकही अर्ज ‘पेंडिंग’ नसल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी गौरव नालिंदे यांनी दिली.
...........................
१९,४४५
जिल्ह्यातील एकूण बांधकाम कामगारांची संख्या
८,०२८
लाभ मिळालेल्या कामगारांची एकूण संख्या
००
त्रुटी असल्याने लाभाच्या प्रतीक्षेत असलेले कामगार
...............
बॉक्स :
काय म्हणतात कामगार...
लॉकडाऊनकाळात शासनाने मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट होती; मात्र सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्याने अर्जही करता आला आणि मदतही वेळेत मिळाली.
- रमेश खिल्लारे
बांधकाम कामगार
.............
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात बांधकाम कामगार म्हणून माझी नोंद आहे. अशात लॉकडाऊन काळात दोन टप्प्यात पाच हजारांची मदत मिळणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अर्ज केला. बँक खात्यामध्ये वेळेत मदत जमा झाली.
- कय्यूम शब्बीर शेख
बांधकाम कामगार
..............................
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून लॉकडाऊनकाळात कोरोनाची भीती असतानाही सर्व कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता बांधकाम कामगारांचे अर्ज स्वीकारून त्यांना मदत मिळवून दिली. मध्यंतरी काही अर्जांमध्ये त्रुटी होती; मात्र आजरोजी सर्व अर्ज निकाली काढून ८०२८ कामगारांना मदत देण्यात आली.
- गौरव नलिंदे
सरकारी कामगार अधिकारी, वाशिम