अखेर सिव्हिल लाईन रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:39+5:302021-09-11T04:42:39+5:30
रिसोड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला सिव्हिल लाईनचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून चुकीच्या राजकारणाचा बळी ठरला होता. या रस्त्यालगत ...

अखेर सिव्हिल लाईन रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा
रिसोड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला सिव्हिल लाईनचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून चुकीच्या राजकारणाचा बळी ठरला होता. या रस्त्यालगत बसस्थानक, तहसील कार्यालय, पोस्ट ऑफिस, गॅस एजन्सी, बगडिया महाविद्यालय, न्यायालय, शिवाजी विद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, पोलीस ठाणे, ब्रह्मकुमारी विद्यालय, गजानन महाराज संस्थान, इत्यादींसह महत्त्वाची व्यापारी प्रतिष्ठानेही आहेत; यामुळे या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असतेच; परंतु रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता होण्यासाठी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ता अनंत देशमुख यांनी आमरण उपोषण करून रस्त्याच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यामुळे प्रशासनाने घाईघाईने काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु काम सुरू झाले नव्हते. आता आमदारांनी विशेष लक्ष देऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करून नागरिकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला आहे. रस्ताकामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार अमित झनक यांच्यासह शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव गवळी, शहराध्यक्ष अरुण मगर, माजी नगराध्यक्ष प्रा. काशीनाथ साबळे, शंकरराव हजारे, नगरपरिषद उपाध्यक्ष तस्लिमभाई, युवा नेतृत्व सचिन इप्पर, बी. टी. बिल्लारी, कार्यकारी अभियंता डाखोरे, शाखा अभियंता केशवराव जोगदंड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.