वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 28, 2014 23:45 IST2014-06-28T23:01:24+5:302014-06-28T23:45:14+5:30
१२ निंबाची झाडे बेकायदा तोडल्याच्या प्रकरणी एक ठेकेदार व दोन वृक्ष कटाई कामगार अशा तिघांविरुद्ध मानोरा पो.स्टे.ला गुन्हे दाखल करण्यात आले.

वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल
मानोरा : तालुक्यातील कारखेडा -वरोली रस्त्यालगतची जि.प.बांधकाम विभागाच्या हद्दीत येणारे १२ निंबाची झाडे बेकायदा तोडल्याच्या प्रकरणी एक ठेकेदार व दोन वृक्ष कटाई कामगार अशा तिघांविरुद्ध मानोरा पो.स्टे.ला गुन्हे दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाच्या चौकशीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्य जागेतील निंबाची झाडे परस्पर ठेकेदाराला एका शेतकर्याने विकल्याची माहिती बाहेर आली.पण, या प्रकरणी पोलिसांनी सदर शेतकर्याविरुद्ध अद्यापही कसलीही कार्यवाही केलेली नाही.
मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या कारखेडा ते वरोली रस्त्यावरील जि.प.बांधकाम विभागाच्या हद्दीतील निंबाच्या १२ झाडांची कत्तल होत असल्याची माहिती जि.प.बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष लळे यांना कळताच ते मैलकामगार रज्जाक याच्यासह घटनास्थळावर पोहोचले. त्यावेळी तेथे वृक्ष कटाई करणार्या दोन मजुरांना पकडून त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.त्यावेळी वृक्ष तोडणार्या मजुराने कारंजा येथील ठेकेदार शेख रहीम शे.इस्माईल यांचे नाव घेतले.यावरून तिघांविरुद्ध मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सदर वृक्ष कटाई करणारे मजूर व ठेकेदार हे कारंजा येथील रहिवासी आहे. गेल्या तीन दिवसापासून ते निंबाच्या झाडाची कटाई करीत होते.या प्रकरणी ठेकेदाराची व वृक्ष तोडणार्या मजुरांची पोलिसांनी चौकशी केली असता बांधकाम विभागाच्या हद्दीत रस्त्यालगत असलेले सदर निंबाचे १२ वृक्ष एका शेतकर्याने विकले असल्याची माहिती मिळाली.ते शासकीय जागेतील वृक्ष परस्पर विकणार्या शेतकर्याविरुद्ध शासकीय मालमत्तेची परस्पर विक्री करण्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाणे आवश्यक आहे.ती मानोरा पोलिस कधी करतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.