खुल्या खाद्यपदार्थ विक्रीचा घातक ट्रेड
By Admin | Updated: July 22, 2014 22:07 IST2014-07-22T22:07:02+5:302014-07-22T22:07:02+5:30
नागरिकांच्या जिवित्वाशी खेळ, औषधी प्रशासनाचे साफ दुर्लक्ष, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

खुल्या खाद्यपदार्थ विक्रीचा घातक ट्रेड
वाशिम : शहरातील विविध भागात खुलेआम खाद्यपदार्थाची विक्री सुरू आहे. अनेक खवय्ये जिभेचे चोचले पुरविण्यासाठी या खाद्यपदार्थावर ताव मारताना दिसतात. परंतु अस्वच्छ , घाण परिसरात नियमांचे उल्लंघन करून विकले जाणारे हे खाद्य पदार्थ रोगराईला आमंत्रण देत आहेत. अन्न, औषधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य धोक्यात आल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. गोरगरिबांच्या सोयीसाठी असलेले जिल्हा सामान्य रूग्णालय, पाटणी चौक, अकोला नाका, पोस्ट ऑफीस चौक, पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका, लाखाळा, शिवाजी चौक, आंबेडकर चौकासह शहरातील विविध गजबजलेल्या परिसरात खुलेआम खाद्यपदार्थाची विक्री होते. शहरातील हॉटेल्स- रेस्टाँरेंटमध्ये तुंडूब गर्दी असते. नियमानुसार हॉटेल किंवा उघडयावर होणार्या खाद्य पदार्थाची तपासणी करण्याची जबाबदारी अन्न औषध प्रशासन विभागाची आहे. परंतु पावसाळा सुरू झाल्यावरही प्रशासनाने कोणतीच तपासणी मोहीम हाती घेतलेली नाही. परिणामी अस्वच्छ खाद्यपदार्थ खाल्ल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे विविध आजार बळावत आहेत.
** गॅस्ट्रो, काविळसह अतिसाराची शक्यता
उघडयावरील दूषित खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे विविध आजार बळावतात. पावसाळयात या आजारांचा प्रसार अधिक वेगाने होतो. प्रदूषित पाणी वापरल्यास टायफाईड, कॉलरा, काविळ, गॅस्ट्रो आदींचा प्रादूर्भाव होऊ शकतो. इतकेच नव्हे तर या शिळया व दूषित खाद्य पदार्थामुळे अतिसारही होतो. कित्येकदा अन्नातून विषबाधा देखिल होते. त्यामुळे निदान पावसाळयात तरी उघडयावरील दूषित व अस्वच्छ खाद्यपदार्थ टाळायला हवे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व्ही.डी. क्षिरसागर यांनी लोकमतला दिली.
** नोकर, कर्मचार्यांची तपासणी बंधनकारक
हॉटेलमध्ये काम करणारे नोक आणि कर्मचार्यांची शारीरिक स्वच्छता, आरोग्य आदीची तपासणी हॉटेल मालकाने केली किंवा नाही याची चौकशी करण्याचा अधिकार अन्न , औषध प्रशासन कार्यालयाला आहे. त्यामुळे ही तपासणी करणे गरजेचे आहे.