उपोषणाचा बुधवार
By Admin | Updated: August 14, 2014 02:06 IST2014-08-14T01:53:13+5:302014-08-14T02:06:41+5:30
विविध मागण्यांसाठी विविध संघटनांच्यावतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात आले.

उपोषणाचा बुधवार
वाशिम : विविध मागण्यांसाठी विविध संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, उपोषण आंदोलन छेडण्यात आले.
मानवी हक्क सुरक्षा दलाच्या वतीने प्रदेश महासचिव गजानन खंडारे व जिल्हाध्यक्ष आत्माराम सुतार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. सदर निवेदनकर्त्यांनी उपविभागीय अधिकार्यांना दिलेल्या निवेदनामध्ये आपल्या विभागात येणार्या गावात ज्या भुमिहीन लोकांनी महसूल व वन विभागाच्या पडीत जमिनीवर अतिक्रमण केले आहेत. त्यांची जमिनीच्या मुळ रेकॉर्डला नोंद होण्याचे निर्देश देवून प्रतिवेदात्मक अहवाल बनविण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी नमुद केली आहे. भूमिहीन, बेघर कुटुंबाला न्याय देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अजूनही याकडे कुणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषण कर्त्यामध्ये जगदीशकुमार इंगळे, भारत अंभोरे, अशोक तिडके, जयसिंग आडे यांचा समावेश आहे.
वाडी वाकद : रिसोड तालुक्यातील वाडी वाकद येथील गारपीट ग्रस्त शेतकर्यांना अर्थसाहाय्य मिळावे यासाठी समस्त गावकर्यांनी उपोषण सुरु केले आहे. फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीटमध्ये वाडीवाकद गावचे अतोनात नुकसान झाले आहे. वाडी वाकद गावाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन गावकर्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे गावकर्यांच्या मदतीबाबतच्या अपेक्षा उंचाविल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री परतीच्या मार्गावर निघाले आणि गावकर्यांच्या समस्याही जागेवरच राहिल्या, असे चित्र पाहावयास मिळत आहे. संबंधित कर्मचार्यांनी अनेक शेतकर्यांचा समावेश नुकसानग्रस्तांच्या यादीत केला नाही. त्यामुळे गावातील अनेक शेतकरी व पशुपालकांना नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. प्रशासनाने आता तरी योग्य सर्वे करावा, कर्तव्यात दिरंगाई करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.