शेतकरी जाणार संपावर!
By Admin | Updated: June 1, 2017 01:56 IST2017-06-01T01:56:09+5:302017-06-01T01:56:09+5:30
वाशिम : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत गट ग्रामपंचायत टणका येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.

शेतकरी जाणार संपावर!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्यशासन गंभीर नसल्याचा आरोप करीत गट ग्रामपंचायत टणका येथील शेतकऱ्यांनी १ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतने ठरावदेखील घेतला. तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
उत्तर प्रदेश या राज्यामध्ये शासनाने संपूर्ण कर्जमाफी केलेली असताना महाराष्ट्र शासन मात्र कर्जमाफीच्या प्रश्नासंदर्भात उदासीन आहे, असा आरोप टणका येथील शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने वाशिम तालुक्यातील गट ग्रामपंचायत टणका, सोनगव्हाण, झोडगा येथे ३० मे २०१७ रोजी झालेल्या मासिक ग्रामसभेत सर्व सदस्यांच्या अनुमोदनाने गट ग्रामपंचायत टणका, सोनगव्हाण व झोडगा येथील शेतकरी १ जूनपासून बेमुदत संप पुकारणार, असा निर्धार करण्यात आला. सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव द्यावा, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज पुरवठा मिळावा, ठिंबक व तुषार सिचंनासाठी १०० टक्के अनुदान देण्यात यावे, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांना वयाच्या ६० व्या वर्षानंतर पेन्शन लागू करावी आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी संपावर गेला, तर काय होऊ शकते, याचे गांभीर्य इतरांसह सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आता शेतकरीच संपावर जाणार, असा निर्धार टणका, सोनगव्हाण, झोडगा येथील शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांच्या उपरोक्त मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अशी मागणी सरपंच गोदावरी राजेश मस्के, ग्रामपंचायत सदस्य संजय गव्हाणे, सागर शिंदे, शंकर कालापाड, विजय मार्कड, रवींद्र शिरसाट या शेतकऱ्यांनी केली.