पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; प्रशासन गप्प!
By Admin | Updated: April 25, 2017 01:50 IST2017-04-25T01:50:35+5:302017-04-25T01:50:35+5:30
कोंडाळामहाली : पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; प्रशासन गप्प!
कोंडाळामहाली : पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी बँकेमध्ये चकरा मारण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोमवारी चकरा मारूनही रक्कम मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना खाली हात परत जावे लागले.
२४ एप्रिल रोजी दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पार्डीटकमोर येथे पीक कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी परिसरातील शेतकरी बँकेत गेले होते. रक्कम नसल्याने या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शेतकऱ्यांना किसान क्रेडिटद्वारे पीक कर्ज वाटप करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एटीएममधून पैसे निघत नाहीत. तसेच एटीएममधून ट्रान्सफर केलेल्या बचत खात्यामधूनसुद्धा रोख रक्कम बँकेमधून मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन व्यवहार ठप्प झाले आहेत.
शासन कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती करीत असले, तरी सर्व शेतकऱ्यांना सर्वच व्यवहार कॅशलेसमध्ये करणे शक्य होत नाही आणि रोख रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी २ लाख रुपये पीक कर्ज घेतले, तेवढी रक्कम एटीएममधून किंवा विड्रॉल स्लीपने एक महिन्यातही निघत नाही. त्याकरिता एक महिना बँकेत चकरा माराव्या लागण्याची शक्यता आहे. त्याकरिता लागणारा प्रवास खर्च, बुडणारी मजुरी, शारीरिक आणि मानसिक त्रास आदी बाबींचे कुणाला काही सोयरसुतक आहे का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्याजवळून एक महिन्यासाठी खासगी कर्ज काढून पीक कर्ज भरले. त्यांचे पैसे परत करण्याकरिता आता पैसे नसल्याने व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांनाच बसणार आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
दोन दिवसांपासून बँक बंद असल्यामुळे कॅश आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही कॅश देऊ शकलो नाही.
- सुुनील चौधरी, शाखाधिकारी, दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा पार्डीटकमोर