वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी त्रस्त

By Admin | Updated: August 14, 2014 02:06 IST2014-08-14T01:48:47+5:302014-08-14T02:06:09+5:30

वनविभागाचे दुर्लक्ष : पंचनामा करुन नुकसानभरपाईची मागणी.

Farmers in Mangrolpir taluka suffer from wildlife breeding | वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी त्रस्त

वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी त्रस्त

मंगरुळपीर: तालुक्यातील अनेक गावांत वन्यप्राण्यांनी हैदौस घालून पिकांची नासाडी चालविल्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. वनविभागाने या प्रकरणी लक्ष घालून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.
यंदा अत्यल्प पावसामुळे जंगल परिसरातील जलाशय, तलाव कोरडे ठण पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांनी लोकवस्तीकडे आपला मोर्चा वळविला आहे. तालुक्यातील शेगी, सनगाव, मसोला, सायखेडा, वनोजा, दस्तापूर, वनोजा, तांदळी, भूर, चोरद, बोरव्हा, चांधई, चकवा आदि गावांत वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. ओलिताची व्यवस्था असलेल्या शेतशिवारात घुसून तहान भागविण्यासह हे वन्यप्राणी शेतामधील उभ्या पिकांवर ताव मारून शेतकर्‍यांचे नुकसान करीत आहेत. पिकांची नासाडी करणार्‍या वन्यप्राण्यांमध्ये प्रामुख्याने हरीण, माकड, रानडुक्कर आदिंचा समावेश आहे. पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकर्‍यांनी वांगी, टोमॅटो, आदिंसह पालेभाज्यांची लागवड केली आहे, तर काही शेतकर्‍यांच्या केळी, पपई, डाळींब आदि फळांच्या बागा आहेत. त्यामुळे त्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते; परंतु रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांचा शेतशिवारात मुक्त संचार असल्यामुळे शेतकर्‍यांच्या जिवाला धोकाही निर्माण झाला आहे. जीव मुठीत घेऊन शेतकरी पिकांना पाणी देण्यासह शेताची रखवाली करीत आहेत. गतवर्षी अतवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यानंतर यंदा अवर्षणामुळे दूबार, तिबार पेरणीचे संकट त्याच्यावर ओढवले. एवढय़ा सगळय़ा संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना वन्यप्राण्यांनीही त्रस्त करून सोडले आहे. उल्लेखनीय बाब, अशी की वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिक नुकसानीचा पंचनामाही वनविभागाकडून करण्यात येत नाही किंवा शेतकर्‍यांना कसल्याही प्रकारची नुकसानभरपाईसुद्धा मिळत नाही. दुसरीकडे एखादवेळी हरीण, काळविटासारखा प्राणी शेतशिवारात कोण्या कारणामुळे दगावला, तर वनविभागाकडून शेतकर्‍याची कसून चौकशी केली जाते. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी त्वरीत लक्ष घालून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकर्‍यांच्या पिकाची नासाडी थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Web Title: Farmers in Mangrolpir taluka suffer from wildlife breeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.