वाशिम जिल्ह्यातील २९ कुटुंबांना मिळाला शेतकरी अपघात विमा योजनेचा मदतीचा हात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 20:13 IST2017-11-13T20:12:26+5:302017-11-13T20:13:49+5:30
अपघात होऊन शेतक-याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे

वाशिम जिल्ह्यातील २९ कुटुंबांना मिळाला शेतकरी अपघात विमा योजनेचा मदतीचा हात!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पुरात वाहून जाणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊन शेतकºयाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे २ लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. वाशिम जिल्ह्यात या योजनेतून १ डिसेंबर २०१५ पासून आतापर्यंत २९ शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ लक्ष रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.
घरातील कर्त्या पुरूषाचा अपघात झाल्यास उत्पन्नाचे साधन बंद होऊन कुटूंबात अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकºयास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ असा असून दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यातील सर्व सातबाराधारक शेतकºयांचा विमा हफ्ता शासनामार्फत भरण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांना दोन लक्ष रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळाले आहे. अपघात होणाºया शेतकºयांचा विमा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतरही ९० दिवसापर्यंत केव्हाही विमा कंपनीकडे सादर करता येणार आहे. विम्याचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी १० ते ७५ वर्षे वयोगटातील व सातबाराधारक असणे आवश्यक आहे. अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते, तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.