बनावट शासन आदेशाने केला गावाचा कायापालट!
By Admin | Updated: September 20, 2014 01:09 IST2014-09-19T23:27:42+5:302014-09-20T01:09:17+5:30
खामगाव तालुक्यातील एका गावात धडकले बनावट शासन आदेश; घरकुलापोटी घरा-घरात शौचालयं.

बनावट शासन आदेशाने केला गावाचा कायापालट!
लक्ष्मण ठासरे/पळशी बु. (खामगाव)
५00 घरकूलं मंजूर झाल्याचे बनावट शासन आदेश खामगाव तालुक्यातील एका गावात धडकले आणि या आदेशाने गावाचा कायापालट करून टाकला. घरकुलांचा लाभ मिळेल, या आशेने ग्रामस्थांनी घरा-घरात शौचालयं बांधली आणि ग्राम पंचायतच्या थकीत कराचा भरणाही केला. कागदाच्या एका तुकड्याने गावाचं भलं झालं असलं तरी, यामागे फसवणुकीचा प्रकार असल्याने यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील ग्रामस्थांनी २000-0१ या वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याने, राज्य शासनाकडून यशवंत ग्राम पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या एक महिना अगोदर, म्हणजे यावर्षीच्या जून महिन्यात गावातील एका ई महासेवा केंद्राच्या नावे बुलडाणा येथील पोस्टाचा शिक्का असलेले पाकिट आले. पळशी गावाला यशवंत ग्राम पुरस्कार मिळाल्याने राजीव गांधी यशवंत ग्राम आवास योजनेअंतर्गत घरकूल अनुदान योजनेमधून प्रत्येकी २ लाख २0 हजार रुपये खर्चाची ५00 घरकुलं मंजूर झाली असल्याचा शासन आदेश या पाकिटात होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या घरी शौचालय असणे, असेल तर त्याचा वापर सुरू असणे आणि ग्राम पंचायत कराची कोणतीही थकबाकी नसणे, या अटी शासन आदेशात नमुद करण्यात आल्या होत्या. हे पत्र ई महासेवा केंद्राच्या संचालकाने ग्रामस्थांना दाखविले. त्यानंतर गावकर्यांना या आदेशाची माहिती देण्यासाठी दवंडीसुध्दा देण्यात आली.
त्यानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) यांच्या नावे असलेले आणखी एक पत्र पळशी येथे आले. त्यानुसार ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी ग्रामस्थांना अर्ज देवून, अटी पूर्ण केल्यास घरकूल मिळवून देण्याचे आश्वासन देण्यास सुरुवात केली. या अटींच्या पुर्ततेसाठी काही ग्रामस्थांनी कर्ज घेतले, काहींनी नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे घेतले, काहींनी तर मिळेल त्या भावाने जनावरं आणि अगदी दागिणे मोडून शौचालयाचे काम पूर्ण करुन घेतले. ज्या ग्रामस्थांकडे ग्राम पंचायतचा कर थकीत होता, त्यांनीही जुळवाजुळव करून कराचा भरणा केला. सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर ग्रामस्थ अर्ज घेवून ग्राम सचिवाकडे गेले असता, अशा कोणत्याही योजनेबाबत आपणाकडे कोणताही शासन आदेश नसल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
** ग्राम पंचायत निवडणुकीची किनार
२३ मार्च २0१४ रोजी पळशी ग्राम पंचायतीची निवडणूक झाली. त्यावेळी गावातील पुढारी व ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी ग्रामस्थांना घरकूल मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. आता मात्र ही मंडळी या प्रकारावर चुप्पी साधून आहे.