बॉम्बने भरलेली बॅग आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:51+5:302021-09-27T04:45:51+5:30
धनंजय कपाले वाशिम : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौक परिसरातील एका दुकानासमोर बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची वार्ता ...

बॉम्बने भरलेली बॅग आढळल्याने खळबळ
धनंजय कपाले
वाशिम : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौक परिसरातील एका दुकानासमोर बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची वार्ता शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस अधिकाऱ्यांसह क्यूआरटी, बॉम्बशोधक व नाशक पथकही घटनास्थळावर तातडीने दाखल झाले. काही वेळानंतर बॉम्बशोधक पथकाने संशयित बॅग जप्त करून ताब्यात घेतली. भल्याभल्यांच्या अंगावर शहारे उभे करण्याऱ्या ‘मॉक ड्रील’च्या (प्रात्यक्षिक) या घटनेने पाटणी चौकात स्मशान शांतता पसरली होती.
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौक परिसरात बॉम्बने भरलेली बॅग आढळल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. ही बॅग ज्या ठिकाणी आढळून आली, त्या ठिकाणी स्टेट बँक, हॉस्पिटल, अनेक मोठी प्रतिष्ठाणे असल्याने, या परिसरात नागरिकांची कायम गर्दी असते. या गर्दीच्या ठिकाणी एका हार्डवेअरच्या दुकानासमोर बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. लगेचच पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाचे वाजणारे सायरन, आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले जवान, बॉम्बशोधक पथकाचे वाहन असा भरगच्च ताफा असलेली भरधाव वेगातील सायरन वाजवत निघालेली वाहने बघून वाशिमकरांच्या हृदयाचे ठोके अतिशय वेगाने पडायला लागले. पोलीस यंत्रणेची धावपळ बघून नागरिकही त्या ठिकाणी नेमके काय झाले, हे बघण्यासाठी गर्दी करत होते.
पोलिसांनीही पुढील अनर्थ टाळण्यासाठी पाटणी चौक परिसरातील अकोला नाक्याकडे जाणारा रस्ता सील करून टाकला. नागरिकांना घटनास्थळापासून दूर केले. एकूणच हे सर्व गंभीर वातावरण पाहून नागरिकांनाही काही काळापर्यंत चांगलाच घाम फुटला होता.
पोलिसांकडून हे दृश्य अशा प्रकारे उभे करण्यात आले होते की, हा सराव (मॉक ड्रील) आहे, अशी शंकाही कुणाला येऊ शकली नाही. पोलीस यंत्रणा आणि बॉम्बशोधक पथक ही घटना कशा प्रकारे हाताळते, याकडे उपस्थित नागरिक बारकाईने लक्ष ठेवून होते. काही नागरिकांनी तर घटनास्थळाहून अक्षरश: पळ काढून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. बॉम्बशोधक व नाशक पथकाने जेव्हा ही बॅग आपल्या वाहनात जप्त करून शहराबाहेर निघाले, त्यावेळी सर्व उपस्थितांनी सुटकेचा श्वास टाकत पोलिसांच्या या कारवाईचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
‘मॉक ड्रील ’म्हणजे काय?
‘मॉक ड्रील’ म्हणजे खऱ्या परिस्थितीसारखी खोटी परिस्थिती निर्माण करून, ती परिस्थिती कशी हाताळावी, याचा सराव करणे म्हणजेच ‘मॉक ड्रील’ म्हटले जाते. शहरात जर काही अनुचित प्रकार घडला तर, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्व तयारी म्हणून वाशिम पोलिसांनी हे प्रात्यक्षिक (मॉक ड्रील) केले. साधारण दोन तास चाललेले हे मॉक ड्रील आणि त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ, यामुळे वाशिम शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेमागचे सत्य एवढेच आहे की पोलीस आणी इतर यंत्रणा किती सजग आहेत, याची चाचपणी करण्यासाठी अशा प्रकारे मॉक ड्रील घेण्यात येतात.