परीक्षा शुल्क माफी निर्णयाची अंमलबजावणी शून्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:17 IST2020-01-28T15:16:42+5:302020-01-28T15:17:26+5:30
- संतोष वानखडे वाशिम : आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे राज्यातील वाशिमसह ...

परीक्षा शुल्क माफी निर्णयाची अंमलबजावणी शून्य !
- संतोष वानखडे
वाशिम : आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे राज्यातील वाशिमसह ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पृष्ठभूमिवर पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांचे शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ केले. या निर्णयाला सव्वा दोन महिन्याचा कालावधी होत असताना, अमरावती विभागात या निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्री वादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे वाशिम, अकोला बुलडाणा यासह राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३२५ तालुक्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. सदर आपदग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याबाबत व विविध सवलती लागू करण्यासंदर्भातील महसूल व वन विभागाने १८ नोव्हेंबर २०१९ रोजी आदेश जारी केले होते. ज्या शेतकºयांच्या पाल्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमांकरीता प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षा शुल्क माफ करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात आले आहे, त्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क संबंधित संस्थेमार्फत परत करण्यात यावे, असे शासन आदेशात स्पष्ट नमूद आहे. सदर आदेश जारी होण्यापूर्वी अमरावती विभागातील शेतकरी पाल्यांनी दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन परीक्षांचे शुल्क भरलेले होते. सव्वा दोन महिन्याच्या या कालावधी परीक्षा शुल्क भरलेल्या शेतकरी पाल्यांची माहिती संकलित करणे आणि परीक्षा शुल्क परत करण्याच्या दृष्टिने कार्यवाही होणे अपेक्षीत होते. मात्र, अद्याप शेतकरी पाल्यांची माहितीदेखील संकलित न केल्याने पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. वाशिम जिल्ह्यातील ७९३ गावांमधील शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ झालेले आहे. परंतू, याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.
शेतकरी पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करावी यासंदर्भात शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात फेरआढावा घेण्यात येईल.
- शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
परीक्षा शुल्क माफी निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करू.
- तानाजी नरळे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. वाशिम