पोलीस आईसोबत आता रोज गमाडी गंमत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:18+5:302021-09-27T04:45:18+5:30
वाशिम : महिलांना पुरुषांच्या तुलनेत कुटुंबाला अधिक वेळ द्यावा लागतो. आई, पत्नी, सून म्हणून कर्ज बजावत ड्यूटी करताना रात्री ...

पोलीस आईसोबत आता रोज गमाडी गंमत !
वाशिम : महिलांना पुरुषांच्या तुलनेत कुटुंबाला अधिक वेळ द्यावा लागतो. आई, पत्नी, सून म्हणून कर्ज बजावत ड्यूटी करताना रात्री घरी परतण्याची वेळही निश्चित नसते. अशावेळी त्यांच्या मुलांना आईची उणीव भासते. तिच्या घरी नसण्याने ते अनेकदा हिरमुसतात. आता मात्र ही स्थिती बदलणार असून महिला पोलिसांच्या दैनंदिन कामाचे चार तास कमी करण्यात आल्याने त्या कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकणार आहेत. त्यांच्या मुलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला.
पोटच्या गोळ्यांकडून होणाऱ्या हट्टाला बाजूला सारून पोलीस खात्यातील महिला कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावत होत्या. शासनाने महिला पोलिसांना ड्यूटीत चार तासांची सूट देऊन केवळ आठच तास काम करण्याची मुभा दिल्याने पोलीस मातांना आता मुलाबाळांना पुरेसा वेळ देता येणार आहे.
...............................
१३
जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाणे
१४९०
एकूण पोलीस
४२३
महिला पोलीस
.......................
आता आईसोबत रोज खेळता येणार
माझी आई कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आहे. ती कुटुंबातील सर्वांसह माझी पण खूप काळजी घेते; पण रात्री उशिरापर्यंत ड्यूटी करावी लागत असल्याने तिच्यासोबत खेळायला मिळत नाही. यापुढे मात्र ती जास्त वेळ घरी राहणार असून तिच्यासोबतच रोज खेळता येणार.
- वेदांत स्विटी उत्तरवार
...........
आईला साप्ताहिक सुटी असेल त्याचदिवशी ती पूर्ण दिवस आम्हाला देते. इतर वेळी तर नेहमी तिची धावपळच सुरू असल्याचे दिसून येते. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने आम्ही दिवसभर घरी राहत असल्याने तिची खूप आठवण येते. आता कामाचे चार तास कमी झाल्याने आई आम्हाला पुरेसा वेळ देईल.
- श्रेया शालिनी इंगळे
...............
आईने ड्युटी आटोपून रोज लवकर घरी यावे, असे नेहमी वाटते. आठवण आल्यानंतर फोन करून तिच्याशी बोलतो. कधीकधी ती लवकर घरी परतली की खूप आनंद होतो. आता तर तीच्या कामाचे चार तास कमी झाल्याने खूप आनंद झाला आहे. आता मला फोनवर बोलायची गरज राहणार नाही. मी तिच्यासोबत खूप मज्जा करणार आहे.
- अर्णव प्रियंका लाटे