जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 16:52 IST2021-07-05T16:52:45+5:302021-07-05T16:52:51+5:30
Code of conduct control room at district level : मतदार, उमेदवार व राजकीय पक्ष यांना प्रत्यक्ष नियंत्रण कक्षामध्ये किंवा दूरध्वनी क्रमांकावर, व्हाटसअपद्वारे आपल्या तक्रारी नोंदविता येतील

जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन
वाशिम : वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ६ पंचायत समित्यांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक आचारसंहिताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष निरंतर सुरु राहणार असून मतदार, उमेदवार व राजकीय पक्ष यांना प्रत्यक्ष नियंत्रण कक्षामध्ये किंवा दूरध्वनी क्रमांकावर, व्हाटसअपद्वारे आपल्या तक्रारी नोंदविता येतील, असे आचारसंहिता विषयक नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी सांगितले.
आचारसंहिता विषयक प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या माळ्यावर आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आलेल्या या कक्षामधील ०७२५२-२३४२३८ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकावर संदेशाद्वारे मतदार, उमेदवार व राजकीय पक्ष यांना आचारसंहिता विषयक तक्रारी नोंदविता येतील. या तक्रारींची दखल घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी नियंत्रण कक्षामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तालुकास्तरावरही आचारसंहिता नियंत्रण कक्ष
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता विषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय आचारसंहिता नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्या ठिकाणीही मतदार, उमेदवार व राजकीय पक्ष यांना आचारसंहिता विषयक तक्रारी नोंदविता येतील.