वाशिम जिल्ह्यात ३२ पथके स्थापन
By Admin | Updated: June 22, 2014 01:25 IST2014-06-22T01:24:42+5:302014-06-22T01:25:20+5:30
साथ रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज

वाशिम जिल्ह्यात ३२ पथके स्थापन
वाशिम: पावसाळा आला की, दूषित पाणी व डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे ग्रामीण भागात विविध गावांमध्ये अतिसार, विषमज्वर, कॉलरा, कावीळ व अन्य प्रकारच्या साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. म्हणूनच ह्यआला पावसाळा, आरोग्य सांभाळाह्ण असे म्हटले जाते. त्यामुळे पावसाळ्यात या रोगांची साथ उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात जिल्हा ,तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अशी एकूण ३२ साथरोग नियंत्रण पथके व ३२ साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ७ जून ते २ ऑक्टोबर या कालावधीत साथरोगाला आळा घालता यावा, यादृष्टीने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक असे २५ साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच आरोग्य केंद्रात साथरोगांच्या नियंत्रणासाठी २५ साथरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सहायक, एक परिचारिका, एक आरोग्यसेवक , एक परिचर व एक वाहनचालक असे कर्मचारी २४ तास सज्ज राहतील. या पथकाजवळ अँम्ब्युलन्समध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य सहायकाच्या कक्षात शासनाने निर्देशित केल्यानुसार साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक अशा २१ प्रकारच्या औषधाच्या कीट सज्ज राहणार आहेत. याप्रमाणेच जिल्ह्यातील सहा तालुकास्तरावर गटविकास अधिकार्यांच्या सहकार्याने तालुका आरोग्य अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली सहा साथरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात तालुका आरोग्य अधिकारी स्वत:, पंचायत समितीमधील आरोग्य विभागातील कर्मचारी, तसेच तालुका आरोग्य अधिकार्यांच्या कार्यालयातील एक आरोग्य सहायक, एक परिचर व गटविकास अधिकार्यांच्या सहकार्याने एक वाहनचालक आदी कर्मचार्यांचा समावेश आहे.