पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण प्रशासनासाठी डोकेदुखी!
By Admin | Updated: March 10, 2017 02:11 IST2017-03-10T02:11:25+5:302017-03-10T02:11:25+5:30
शेतक-यांच्या तक्रारी; सात महिन्यांत २५४ रस्ते मोकळे

पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण प्रशासनासाठी डोकेदुखी!
शिखरचंद बागरेचा
वाशिम, दि. ९- शेतशिवारात वहिवाटीसाठी असलेल्या पांदण रस्त्यांवर अर्थात शिवार रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसत आहे. यामुळे सतत होणार्या तक्रारींनी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पांदण रस्त्यांवरील अतिक्र मण काढण्यासाठी त्यामुळे प्रशासनाने मोहीम हाती घेतल्यानंतरही ऑगस्ट २0१६ ते फेब्रुवारी २0१७ पर्यंतच्या सात महिन्यांत ६३४ पैकी केवळ २५४ रस्ते मोकळे करणे प्रशासनाला शक्य झाले आहे.
शेतकर्यांना शेतात ये-जा करणे, मालाची ने-आण करणे यासाठी पांदण रस्ते आवश्यक आहेत. प्रत्येक शिवारात या रस्त्यांची सुविधा असली, तरी अनेक रस्त्यांवर काही व्यक्तींकडून अतिक्रमण करण्यात येते. त्यामुळे शेतकर्यांना शेतात पिकलेल्या शेतमालाची वाहतूक करणे कठीण होते. याबाबत शेतकर्यांकडून महसूल विभागाकडे तक्रारीही करण्यात येतात. अशाच तक्रारी वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांकडून करण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर महसूल शेतशिवारातील अतिक्रमित झालेले पांदण, शेत आणि शिवार रस्ते मोकळे करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
ग्रामपातळीवर हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यामुळे काही ठिकाणचे रस्ते मोकळे झाले असले, तरी अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार वाशिम जिल्ह्यातील ९७६.२0 किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते अतिक्रमित झालेले आढळून आले. या अतिक्रमणामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने शेतशिवारातील शेतकर्यांना वहिवाटीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. शासनाने रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील २५४ किलोमीटरचे १७५ रस्ते अतिक्रमण मुक्त झाले आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५६ किलोमीटर लांबीच्या ६३ पांदण रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यापैकी गत सात महिन्यांत २५.५२ किलोमीटर लांबीचे १८ रस्ते मोकळे करण्यात आले आहे.
मालेगाव तालुक्यातील १८३.५0 किलोमीटरच्या १२६ अतिक्रमित पांदण रस्त्यांपैकी ४.५0 किलोमीटर लांबीचे तीन रस्ते, रिसोड तालुक्यातील १९0 किलोमीटर लांबीच्या ७२ रस्त्यांपैकी ५९.00 किलोमीटर लांबीचे २७ रस्ते मोकळे करण्यात आले. मानोरा तालुक्यातील १९८.५0 किलोमीटर लांबीच्या १९३ अतिक्रमित रस्त्यांपैकी ९९ किलोमीटर लांबीचे ८९ रस्ते मोकळे करण्यात आले आणि कारंजा तालुक्यातील १६२ किलोमीटर लांबीच्या ६९ अतिक्रमित पांदण रस्त्यांपैकी ६६.५0 किलोमीटर लांबीचे ६६ रस्ते मोकळे करण्यात आले.
मंगरुळपीर तालुक्यात कार्यवाही शून्य!
महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार मंगरुळपीर तालुक्यातील १८६.२0 किलोमीटरच्या १११ पांदण रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांशी संबंधित शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे अनेक शेतकर्यांनी तक्रारीही केल्या आहेत; परंतु ३१ जुलै २0१६ च्या सर्वेक्षणानुसार आढळलेल्या १८६.२0 किलोमीटरच्या १११ अतिक्रमित पांदण रस्त्यांपैकी मागील सात महिन्यांच्या काळात अद्याप एकही रस्त्यावरचे अतिक्रमण हटविणे शक्य झाले नाही.
जिल्ह्यातील अतिक्रमित पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण शक्य तितक्या लवकर हटविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. ठोस कारवाई झाल्यास पिकांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमकांनी स्वयंस्फूर्तीने केलेले अतिक्रमण हटवून प्रशासनाला सहकार्य करायला हवे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम