महाराष्ट्राची मान शरमेने खाली
By Admin | Updated: July 24, 2014 22:56 IST2014-07-24T22:56:59+5:302014-07-24T22:56:59+5:30
सेना खासदाराने ‘रोजा’ सोडल्याच्या घटनेबाबत नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

महाराष्ट्राची मान शरमेने खाली
वाशिम : राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या आघ्य कृत्यामुळे महराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. खासदारांना निकृष्टप्रतिचे अन्न मिळत असल्याची तक्रार करत तेथील एका मुस्लिम कर्मचार्याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबून त्याचा रोजा मोडण्याचे निंदनीय कृत्य केले गेले. शिवसेना खासदाराच्या या कृत्याचा समाजाच्या सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या घटनेमुळे सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुतेची शिकवण देणार्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.
** 'आज हे बंद, उद्या ते बंद, आम्ही मुले-मुले आमचा काय संबंध' असं एक बालगीत पूर्वी होतं. आता ते विस्मृतीत गेलं. परंतु छोट्या-छोट्या कारणांवरून वाढणारे ताणतणाव, बंद, मोर्चे, आंदोलने, राडेबाजी या सगळ्या गदारोळात आजचा युवक कसा विचार करतो, याचा धांडोळा शिवसेनेच्या दिल्लीतील आंदोलनाच्या निमित्तानं घेतला असता, त्याच बालगीताची आठवण अनेकांना झाली. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात शिवसेनेनं चांगल्या सुविधांसाठी आंदोलन करताना चक्क रमजानच्या महिन्यात मुस्लिम कर्मचार्याला जबरदस्तीनं चपाती खाऊ घातली. हा प्रकार ज्यांनी-ज्यांनी वृत्तवाहिन्यावर पाहिला, वर्तमानपत्रात वाचला; त्यांनी या कृत्याचा मनोमन निषेधही केला. एरवी महाविद्यालयीन युवकांना अशा राजकीय घटनांविषयी फारशी उत्कंठा नसते. करणं त्यांचं विश्व आता फार विस्तारलंय आणि त्यात जातीधर्माला अजिबात थारा नाही.पण 'हे विश्वची माझं घर' अशा संतवचनाला जागणारा महाराष्ट्र दिल्लीतील त्या घटनेमुळे शरमिंदा झाला. जगाच्या कल्याणासाठी जिथे ज्ञानदेवांनी पसायदान मागितले, त्याच भूमीतील शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला, अशा संतप्त प्रतिक्रिया समाजाच्या सर्वस्तरातून उमटत आहेत. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे, असा सल्लाही अनेकांनी दिला.