७२२३१ घरगुती ग्राहकांकडे ४६.०४ कोटीचे वीजदेयक थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:05+5:302021-02-05T09:26:05+5:30
वाशिम जिल्ह्यात महावितरणचे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक मिळून एकूण १८९३२१ ग्राहक आहेत. त्यात घरगुती ग्राहकांची संख्या १७५२२५ असून, त्यापैकी ७५२३१ ...

७२२३१ घरगुती ग्राहकांकडे ४६.०४ कोटीचे वीजदेयक थकीत
वाशिम जिल्ह्यात महावितरणचे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक मिळून एकूण १८९३२१ ग्राहक आहेत. त्यात घरगुती ग्राहकांची संख्या १७५२२५ असून, त्यापैकी ७५२३१ ग्राहकांकडे ४६.०४ कोटी रुपये थकीत आहेत. हे देयक वसुलीचे मोठे आव्हान महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर आहे. जिल्ह्यात एकूण थकीत देयकाची वसुली करण्यासाठी महावितरणने गेल्या काही दिवसांत अनेक उपक्रम राबविले. बिल थकवणाऱ्यांची वीज तोडली. वीज देयकाचा भरणा व्हावा, यासाठी गावपातळीवर वाहने पाठविली. ज्या विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कमी देयक वसूल केले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मात्र, एवढे होऊनही थकीत देयकाची वसुली होत नसल्याने आता महावितरणने देयक अदा करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्यात सर्व प्रकारातील ग्राहक मिळून १ लाख ४४ हजार ९७९ ग्राहकांकडे ७९५ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी आहे.
-------------------
व्यावसायिक ग्राहकांकडे ८०.०६ कोटी
घरगुती ग्राहकांप्रमाणेच जिल्ह्यातील व्यावसायिक ग्राहकांनीही महावितरणचे कोट्यवधींचे वीजदेयक थकविले आहेत. जिल्ह्यात ११८५१ व्यावसायिक वीज ग्राहक असून, त्यापैकी ५७२० ग्राहकांकडे ८.०६ कोटींचे वीजदेयक थकीत आहे. यातील ३ हजार ग्राहकांना देयक अदा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या असून, महावितरणचे पथक वसुलीसाठी त्यांच्याकडे येरझारा घालत आहेत.
-------------------
औद्योगिक ग्राहकांकडे १.२६ कोटी
जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांप्रमाणेच औद्योगिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. जिल्ह्यात औद्योगिक प्रकारातील २२४५ ग्राहक आहेत. त्यापैकी १६७२ ग्राहकांकडे ७.९६ कोटी रुपये थकीत आहेत. या सर्व ग्राहकांना महावितरणकडून वेळेत देयक अदा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या असून, मुदतीत देयकाचा भरणा न केल्यास वीज जोडणी खंडित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.