चार वर्षांपासून झाले नाही वाशिम जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:30 IST2021-01-12T11:30:14+5:302021-01-12T11:30:20+5:30
Washim district hospital जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट गेल्या ४ वर्षांपासून झालेच नाही.

चार वर्षांपासून झाले नाही वाशिम जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : फायर ऑडिटप्रमाणेच दर दोन वर्षांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिटदेखील होणे क्रमप्राप्त आहे; मात्र स्थानिक जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट गेल्या ४ वर्षांपासून झालेच नाही. रुग्णालयातील ठिकठिकाणची वायरिंग आणि इलेक्ट्रिकचे बोर्ड सुस्थितीत दिसून आले; मात्र ऑडिटच होत नसल्याने धोकासुद्धा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दैनंदिन शेकडो रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येतात. त्यातील अनेक रुग्ण उपचारार्थ भरतीत राहतात. संबंधितांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच कधीकाळी अनुचित घटना घडल्यास त्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे, याकरिता शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वेळोवेळी फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र या महत्त्वाच्या बाबींकडे प्रशासकीय दुर्लक्ष होत आहे. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी केली असता, सर्वच ठिकाणची वायरिंग सुस्थितीत असल्याचे दिसून आले; मात्र गेल्या ४ वर्षांपासून ऑन रेकॉर्ड इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. यामुळे रुग्णसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे वेळीच लक्ष पुरवून इलेक्ट्रिक ऑडिट करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.
रुग्णालयातील वायरिंग सुस्थितीत
वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी केली असता, सर्वच ठिकाणची वायरिंग रीतसर पाइप टाकून सुस्थितीत असल्याचे दिसून आले. याशिवाय कुठेही इलेक्ट्रिकच्या बोर्डांची तोडफोड झालेली नाही. केवळ अधूनमधून व्होल्टेज कमीअधिक होण्याची समस्या असल्याचे दिसून आले.
‘ऑडिट’बाबत प्रशासनाचे दुर्लक्ष
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट दर दोन वर्षांनी व्हायला हवे. रुग्णालय प्रशासनाची ही जबाबदारी होय; मात्र त्याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून ४ वर्षांपासून ऑडिट झालेले नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत उभी झाली, त्यावेळी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या संसाधनांना अनुसरून विद्युत पुरवठा मिळाला होता. सध्या संसाधनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे व्होल्टेजची समस्या जाणवत आहे. रुग्णालयात एक खासगी इलेक्ट्रिशियनची नेमणूक करण्यात आलेली आहे. ऑडिटही लवकरच करून घेतले जाईल.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम