मधुमेह, उच्च रक्तदाबाचे आठ हजार रुग्ण आढळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:36 IST2020-09-29T12:36:22+5:302020-09-29T12:36:34+5:30
आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असून, त्यापैकी आठ हजार नागरिकांना मधुमेह, हायपरटेन्शन असल्याचे दिसून आले. प्र

मधुमेह, उच्च रक्तदाबाचे आठ हजार रुग्ण आढळले!
वाशिम: कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यात येत असून, जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी आठ हजार नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब असल्याचे समोर आले. दुसरीकडे २३७ संदिग्ध रुग्ण आढळले असून, यापैकी १७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
कोरोनाविरुद्ध लढा देताना आरोग्य सुविधेवर ताण येवू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या वेगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न, आरोग्यविषयक जनजागृती आणि लोकसहभागाची गरज या दृष्टिकोनातून ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास १२ लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या दरम्यान ८ हजार नागरिक हे मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याचेही समोर आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देतानाच या नागरिकांवर आरोग्य विभागाचा वॉचही राहणार आहे. सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे आदी लक्षणे आढळून येणारे जवळपास २३७ संदिग्ध नागरिक आढळले असून, यापैकी १७ जणांचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत तीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असून, त्यापैकी आठ हजार नागरिकांना मधुमेह, हायपरटेन्शन असल्याचे दिसून आले. प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करून आरोग्य तपासणी करावी.काही शंका असल्यास संबंधित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
-डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी