लसीकरण, कोरोना चाचणीबाबत ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST2021-05-16T04:40:00+5:302021-05-16T04:40:00+5:30
सध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे जनजीवन पुरते विस्कळित झाले आहे. दरम्यान, ...

लसीकरण, कोरोना चाचणीबाबत ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती
सध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे जनजीवन पुरते विस्कळित झाले आहे. दरम्यान, संसर्गाची साखळी तोडण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यासोबतच प्रभावी उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. त्यास पोलीस विभागाकडूनही सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. ग्रामीण भागात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर तसेच संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासंबंधी मालेगाव पोलीस स्टेशनकडून हद्दीमधील ग्रामीण व शहरी भागात जनजागृती केली जात आहे.
ग्रामीण भागात कोरोना चाचणी व लसीकरणासंबंधी असलेले नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा यामाध्यमातून प्रयत्न केला जात आहे. वेळेत कोरोना चाचणी केल्यास निदान लवकर होऊन उपचार मिळणे शक्य आहे. तसेच लसीकरण केल्यास कोरोनापासून सुरक्षित राहणे शक्य आहे, ही बाब नागरिकांना पटवून देण्यात येत आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी गावोगावी सॅनिटायझर फवारणी करून नागरिकांनी सोशल व फिजीकल डिस्टन्सिंग ठेवणे यासह इतरही नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे येथे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
.................
बाॅक्स :
सुकांडा, भाैरद येथे प्रत्यक्ष भेट
मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ग्राम सुकांडा व भाैरद या गावांमध्ये सध्या कोरोनामुळे हाहा:कारर उडाला आहे. भितीपोटी गावे रिकामी होत असून अनेकजण शेतात वास्तव्याला जात आहे. त्यामुळे या गावांमध्ये कोरोना चाचण्या वाढविणे व लसीकरणासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्याचे काम सध्या पोलीस विभागाने हाती घेतले आहे. त्यानुसार, ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी या गावांना स्वत: भेटी देऊन ग्रामस्थांचे उद्बोधन केले.
.............
बाॅक्स :
शहरी भागातही जनजागृती
मालेगाव शहरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शिवचौक, जोगदंड चौक याठिकाणी बॅनर लावून तथा बीट मार्शलकडून ध्वनिक्षेपकाव्दारे नागरिकांनी नियमावलींचे पालन करण्याबाबत वेळोवेळी आवाहन केले जात आहे. गावात विनाकारण फिरणारे, आवश्यक अस्थापणा वगळता इतर दुकाने अर्धे शटर उघडे ठेवून सुरू राहत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जात असल्याची माहिती ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी दिली.