कारंजा लाड (वाशिम) : कारंजा तालुक्यातील ग्राम म्हसला येथे शेतातील विहिरीचे बांधकाम करताना त्यावरील मजूर व शेतात बकऱ्या चारणारा ६५ वर्षीय वृद्ध अशा दोघांचा विहीर खचल्याने मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी, म्हसला येथील सुधीर थोरात यांच्या गट क्रमांक २९ मधील शेतातील विहिरीचे बांधकाम मजूरांकडून केले जात आहे. विहिरीच्या एका बाजूने केलेले सिमेंटचे बांधकाम अचानक खचल्याने रवी केशव तलवारे( रा. कामठा, वय ४५ वर्षे) हा विहिरीत पडून मलब्याखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला. याच शेतशिवारात बकºया चारणारा पुडंलीक ढाये (वय ६५ वर्षे, रा. म्हसला) हा देखील विहिरीत घसरून पडल्याने त्याचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कारंजाचे तहसीलदार रणजीत भोसले व धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार मानकर, सर्वधर्म आपत्कालीन पथकाचे श्याम सवाई यांनी घटनास्थळी धाव घेवून मलब्याखाली दबलेल्या दोघांना काढण्याचे प्रयत्न सुरू केले. वृत्त लिहिस्तोवर हे मदतकार्य सुरू होते.
कारंजा तालुक्यातील म्हसला येथे विहीर खचून मजुरासह वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 14:44 IST