वाशिम जिल्ह्यात रखरखत्या उन्हामुळे डाळिंब बागा सुकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:29 IST2018-05-24T16:29:55+5:302018-05-24T16:29:55+5:30
वाशिम: उन्हाचा पारा ४३ अशांच्यावर पोहोचला असतानाच पुरेसे पाणी नसल्यामुळे डाळिंबाच्या अनेक बागा सुकल्यात आहेत.

वाशिम जिल्ह्यात रखरखत्या उन्हामुळे डाळिंब बागा सुकल्या
वाशिम: उन्हाचा पारा ४३ अशांच्यावर पोहोचला असतानाच पुरेसे पाणी नसल्यामुळे डाळिंबाच्या अनेक बागा सुकल्यात आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानीपोटी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.
वाशिम जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र लक्षणीय आहे. केळी, संत्रा, पपई, निंबू, डाळिंब, द्राक्ष अशा विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहे. आर्थिक उन्नतीसाठी फळबाग लागवडीचा आधार घेणाऱ्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मात्र उन्हाचा चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पर्जन्यमानाचे प्रमाण दिवसेंदिवस खालावत आहे, तर पाण्याचा उपसा वारेमाप सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी दोन मीटरने खालावली असून, जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक धरणांतील गाळही आता सुकत चालला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच उन्हाचा पाराही ४३ अंशांपेक्षा वरच असल्याने उभ्या फळबागा सुकत आहेत. याचा सर्वाधिक फटका केळी आणि डाळिंबांच्या बागांना बसत असल्याचे दिसत असून, जिल्ह्यातील २० टक्के डाळिंबाच्या बागा उन्हामुळे सुकल्या आहेत. पुरेशा पाण्याचा अभाव आणि कडक उन्ह डाळिंबांसाठी घातक ठरते. गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली असल्याने जमिनीत ओलावा उरला नाहीच शिवाय विहिरींनाही पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांना डाळिंबांच्या बागा जगविणे कठीण झाले. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने डाळिंबांच्या बागाच वाळून जात आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील डिगांबर गिरी या शेतकºयाची पाच एकरातील डाळिंबाची बाग महिनाभरापूर्वीच सुकली, तर महेंद्र इंगोले या शेतकऱ्याची डाळिंबाची बागही उन्हामुळे पूर्णपणे सुकली आहे. अशा अनेक शेतकºयांच्या डाळिंबांना यंदा उन्हाचा फटका बसल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.