नाट्यकलेतील मरगळ झटकल्या जावी - हंसीनी उचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:50 IST2019-12-15T13:50:18+5:302019-12-15T13:50:49+5:30
कलावंतांना व्यासपिठ कसे मिळेल, यासह तत्सम विषयांवर मराठी चित्रपट अभिनेत्री, नाट्य कलावंत हंसीनी उचित यांच्याशी साधलेला हा संवाद...

नाट्यकलेतील मरगळ झटकल्या जावी - हंसीनी उचित
वाशिम : विविध प्रकारचे सामाजिक विषय समाजासमोर मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे नाटक होय. नाट्यकला ही जगातील अन्य सर्व कलांना आपल्या ह्रदयात स्थान देते. वाशिमलाही नाट्यकलेचा प्रदिर्घ असा इतिहास लाभलेला आहे; मात्र गत काही वर्षांमध्ये नाट्यकला आणि त्यात भविष्य घडवू पाहणाऱ्या कलावंतांना व्यासपिठ मिळेनासे झाले आहे. ही मरगळ झटकून नाट्यक्षेत्राला चांगले दिवस कसे येतील, कलावंतांना व्यासपिठ कसे मिळेल, यासह तत्सम विषयांवर मराठी चित्रपट अभिनेत्री, नाट्य कलावंत हंसीनी उचित यांच्याशी साधलेला हा संवाद...
मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्रातील तुमच्या योगदानाविषयी काय सांगाल ?
मला लहानपणापासूनच नाटकांमध्ये अभिनय करण्याची आवड होती. आधी वडिलांची आणि नंतर पतीची त्यासाठी साथ मिळाल्याने १३ मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करता आले. याशिवाय दुरचित्रवाणीवरील ३ मालिका आणि ४ गाजलेल्या नाटकांमध्येही भुमिका करायला मिळाल्या.
तुमच्या नजरेतून पुर्वी आणि आता नाट्यक्षेत्रात वाशिमची स्थिती काय ?
वाशिमला नाट्यकलेचे वरदान लाभलेले आहे. इ.स. ८८० ते ९२० या कालखंडात सुप्रसिद्ध कवी, नाटककार राजशेखर यांचा वारसा या शहराला लाभलेला आहे. याच मातीत सुरूची, साधना नाट्यसंस्था, राजशेखर नाट्यमंडळ, युवाशक्ती कला संच, कलाश्री कला संच यासारख्या नाट्यसंस्था रुजल्या. त्यातील कलावंतांनी नाट्यक्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर पोहचविले; मात्र काळाच्या ओघात आणि प्रशासकीय उदासिनतेमुळे नाट्यक्षेत्रात मरगळ आली असून ती झटकली जाणे आवश्यक आहे.
नाट्यकलेला चांगले दिवस येण्यासाठी काय करता येईल?
अभिनय क्षेत्रात भविष्य घडवू इच्छित युवक, युवतींसाठी प्रथम वाशिममध्ये दर्जेदार नाट्यसंस्था सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वत: अमरावती विद्यापिठाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.
नाटकांमधील अभिनयाच्या प्रकारांविषयी काय सांगाल?
नाटकांमध्ये प्रामुख्याने आंगिक, आहार्य, वाचिक आणि सात्विक हे चार प्रकार पडतात. अभिनय करताना हे चार प्रकार लिलया पेलता यायला हवे. याशिवाय पाचवा घटकही असून त्याचे नाव तात्विक आहे आणि तो कलाकृतीच्या आशयात मोडतो. कलाकृतीमधील तात्विकता जेवढी प्रगल्भ, तेवढी ती कलाकृती समृद्ध होते. ज्याप्रमाणे मजबूत पाया नसलेली इमारत केव्हाही कोसळू शकते, त्याचप्रमाणे तात्विकता नसलेली कलाकृतीही कोसळू शकते.