दारूमुक्तीसाठी डॉक्टर दाम्पत्याचा पुढाकार; मोफत उपचारासह मेडिसिनही देणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST2021-09-13T04:41:08+5:302021-09-13T04:41:08+5:30
वाशिम : दारूच्या आहारी गेलेल्यांचे व्यसन सोडविण्याचा एक प्रयत्न म्हणून शहरातील एका डॉक्टर दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेतला आहे. ...

दारूमुक्तीसाठी डॉक्टर दाम्पत्याचा पुढाकार; मोफत उपचारासह मेडिसिनही देणार!
वाशिम : दारूच्या आहारी गेलेल्यांचे व्यसन सोडविण्याचा एक प्रयत्न म्हणून शहरातील एका डॉक्टर दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेतला आहे. दर महिन्याला किमान एक शिबिर घेऊन किमान ५० जणांची मोफत तपासणी आणि आवश्यक औषधीही मोफत दिली जाणार आहे. डॉ. विवेक साबू आणि डॉ. शुभांगी साबू असे या दाम्पत्याचे नाव आहे.
वाशिम येथे वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असताना, अपघाताच्या घटनांमध्ये काहींना जीव गमवावा लागणे, काहींना अपंगत्व येणे आदी बाबी डॉ. विवेक साबू यांना जवळून पाहता आल्या. अपघाताच्या काही घटनांमध्ये वाहन चालविणारा हा दारूच्या नशेत असल्याचेही दिसून आले. दारूच्या नशेपायी संसारातही कलह निर्माण होतो, तसेच मानसिक स्वास्थ्यही बिघडते. दारूच्या आहारी गेलेल्यांचे व्यसन सोडविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून डॉ. विवेक आणि डॉ. शुभांगी या साबू दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीतून दरमहा मोफत शिबिर घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दरमहा एक तारखेला होणाऱ्या या शिबिरात किमान ५० जणांची मोफत तपासणी आणि आवश्यक ती औषधीदेखील मोफत दिली जाणार आहे.
..........
कोट
वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत असताना कुठे तरी समाजाचे देणे आहे या उदात्त भावनेतून दारूमुक्तीसाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून दरमहा एक तारखेला मोफत शिबिर घेणार आहोत. दारूच्या व्यसनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम असल्याने नागरिकांनीदेखील व्यसनाच्या आहारी जाऊ नये.
- डॉ. विवेक साबू, वाशिम