जिल्हा व्याघ्र समितीच्या बैठकांना तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 15:26 IST2018-07-28T15:24:39+5:302018-07-28T15:26:17+5:30

महिन्यातून किमान एकदा या समितीची बैठक घेणे आवश्यक असताना जिल्ह्यात या बैठकांना तिलांजलीच देण्यात आली आहे.

The District Tiger conservation committee not take meeting | जिल्हा व्याघ्र समितीच्या बैठकांना तिलांजली

जिल्हा व्याघ्र समितीच्या बैठकांना तिलांजली

ठळक मुद्दे १ आॅगस्ट २००३ च्या निर्णयानुसार जिल्हास्तर व्याघ्र कक्ष समित्यांची स्थापना झाली आहे. वन्यजीवांच्या अवैध शिकारीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यासाठी महिन्यातून एकदा बैठक घेणे अनिवार्य आहे. वाशिम जिल्ह्यात अशा बैठकांचे आयोजनच बंद असल्याचे उघड झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यातील वन्यजीव संवर्धनासाठी, वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या अवैश शिकारीस, तसेच त्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी महसूल व वन विभागाच्या १ आॅगस्ट २००३ च्या निर्णयानुसार जिल्हास्तर व्याघ्र कक्ष समित्यांची स्थापना झाली आहे. महिन्यातून किमान एकदा या समितीची बैठक घेणे आवश्यक असताना जिल्ह्यात या बैठकांना तिलांजलीच देण्यात आली आहे. या प्रकारामुळे समिती स्थापनेचा उद्देश बाजूला होऊन वन्यजीवांच्या अवैध शिकारीस वाव मिळत आहे.
वन्यजीव संवर्धनासह वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात घेऊन राज्य शासनाने ७ नोव्हेंबर २०११ रोजीच्या निर्णयाद्वारे राज्यस्तरीय व महसूल विभागस्तरीय व्याघ्र कक्ष समित्यांची स्थापना केली. तथापि, वन्यजीव संवर्धन आणि वन्यप्राण्यांची अवैध शिकार रोखण्याचे काम प्रभावी व्हावे म्हणून राज्यस्तरीय समितीने २८ जून २००२ च्या बैठकीत जिल्हास्तर समित्या स्थापन करण्याची शिफारस केली. त्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला शासनाने १ आॅगस्ट २००३ च्या निर्णयाद्वारे मंजुरी देऊन राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जिल्हास्तर व्याघ्र कक्ष समित्या स्थापन करण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातही अशी समिती स्थापन करण्यात आली. वन्यजीव संवर्धनाविषयी उपाय योजना, वन्यजीवांच्या अवैध शिकारीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यासाठी महिन्यातून एकदा बैठक घेणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात गेल्या गत दोन वर्षांत वन्यप्राण्यांची शिकार, तसेच मांडूळ सापांची तस्करी होत असल्याच्या काही घटना उघडकीसही आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्हा व्याघ्र समितीच्या बैठकीत काही प्रतिबंधात्मक उपायांचे नियोजन होणे आवश्यक आहे; परंतु असे काहीच झालेले नाही. या संदर्भात माहिती घेतली असता वाशिम जिल्ह्यात अशा बैठकांचे आयोजनच बंद असल्याचे उघड झाले आहे. 
 
अशी आहे समितीची रचना 
जिल्हास्तर व्याघ्र समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक, सह अध्यक्ष म्हणून संबंधित प्रादेशिक उप वनसंरक्षक, सदस्य सचिव म्हणून संबंधित विभागीय वन अधिकारी (दक्षता), तसेच सदस्य म्हणून संबंधित उप वनसंरक्षक (वन्यजीव), संबंधित पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा), महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि संबंधित मानद वन्यजीव रक्षकासह स्थायी निमंत्रित सदस्य म्हणून लोहमार्गाचे संबंधित पोलीस अधिक्षकांकडे शासन निर्णयानुसार जबाबदारी सोपविलेली असते. 
 

जिल्हा व्याघ्र समितीच्या यापूर्वीच्या बैठकांबाबत आपणास काही सांगता येणार नाही; परंतु यापुढे ही बैठक नियमित व्हावी म्हणून समिती अध्यक्ष तथा जिल्हा पोलीस अधिक्षकांशी चर्चा करू व सदस्यांना सुचना करू. 
-अशोक वायाळ, सह अध्यक्ष तथा, उप वनसंरक्षक (प्रादेशिक),वन विभाग वाशिम.

Web Title: The District Tiger conservation committee not take meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.