वाशिम जिल्ह्यात सर्पदंशाचा आलेख चढताच!

By Admin | Updated: July 24, 2014 02:08 IST2014-07-24T01:43:07+5:302014-07-24T02:08:44+5:30

तीन वर्षात घडल्या १३५५ घटना : ३0 जण मृत्यूमुखी

In the district of Machhi, the snakebite article is up! | वाशिम जिल्ह्यात सर्पदंशाचा आलेख चढताच!

वाशिम जिल्ह्यात सर्पदंशाचा आलेख चढताच!

संतोष मुंढे / वाशिम
गत तीन वर्षात जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांचा आलेख चढताच आहे. तीन वर्षात जिल्ह्यातील तब्बल १३५५ व्यक्तिंना सापाने दंश केला असून, यामध्ये ३0 जणांची प्राणज्योत मालविली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आकडेवारीने यावर शिक्कामोर्तब केले असून, सर्पदंशाच्या १३२५ रुग्णांना जीवनदान देण्यात या रूग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेला यश आले आहे.
पावसाळ्याला प्रारंभ होताच सर्पदंशाच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचा आजवरचा इतिहास आहे. साधारणपणे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये दडून बसलेले साप पाऊस पडताच जमिनीबाहेर निघतात. त्यामुळेच शेतात मशागत करताना सर्पदशांचा धोका अधिक असतो. जिल्ह्यात नाग (किंग कोब्रा), नाग्यावरवळ (घोणस) , फोशी, कवळय़ानाग, मण्यार, पदमिनी, धुलनागिन या प्रजातीचे विषारी साप आढळतात. तर धामण, पाणजिवड आदी प्रमुख जातीसह जवळपास ३0 ते ३५ जातीचे बिनविषारी साप आढळतात. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २0११ व २0१२ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एक हजार ७८ व्यक्तिंना सर्पदंश झाला होता; परंतु यापैकी बहुतांश रुग्णांनी उपचारासाठी जिल्हास्तरावर धाव घेतल्यामुळे आरोग्य केंद्रात एकाही सर्पबळीची नोंद नाही. जिल्हा रूग्णालयाची सर्पदंशाच्या रूग्णांवर उपचारांमध्ये जिल्हा रुग्णालयांची कामगिरी उजवी ठरली आहे. सन २0११ पासून तर २0१४ पर्यंत तब्बल १३५५ सर्पदंश झालेले रुग्ण येथे दाखल झाले होते. यामध्ये २0११ -१२ मधील ३८८ तसेच २0१२-१३ मधील ४६४ व २0१३-१४ मधील ५0३ सर्पदंश झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. यापैकी केवळ ३0 रूग्णांचीच प्राणज्योत मालविली उर्वरित १३२५ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी तीन वर्षांपूर्वी डब्ल्यू. एच. ओ. मार्फत आस्ट्रेलिया येथे सर्पदंशावर उपचाराचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील सर्पदंश झालेल्या रुग्णांना चांगलाच फायदा मिळत आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांना एस.व्ही नावाचे इंजेक्शन दिल्या जाते. जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयातही ही औषध उपलब्ध आहे. साप चावल्याचे न समजणे, रुग्णालयात हलविण्यासाठी विलंब होणे, खासगीत उपचारासाठी वेळ लावणे आदी कारणांमुळेही सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे.

Web Title: In the district of Machhi, the snakebite article is up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.