नगराध्यक्षांच्या हस्ते शाडू माती गणेशमूर्ती वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST2021-09-11T04:42:44+5:302021-09-11T04:42:44+5:30
शहरातील डॉक्टर राजेश्वर मुलंगे यांच्या निवासस्थानी शाडू माती गणेशमूर्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोड नगराध्यक्ष ...

नगराध्यक्षांच्या हस्ते शाडू माती गणेशमूर्ती वितरण
शहरातील डॉक्टर राजेश्वर मुलंगे यांच्या निवासस्थानी शाडू माती गणेशमूर्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिसोड नगराध्यक्ष विजयमाला आसनकर होत्या. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, श्रावण महिन्यापासून सण व उत्सावाची रेलचेल सुरू होेते. त्यापैकी गणेशोत्सव हा एक आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे हा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा होत आहे. यावर्षीही छोट्या शाडूमातीच्या गणपतीची स्थापना करून आपणास पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला सीमा मुलंगे महाराष्ट्र राज्य हरितसेना सदस्या, जया चारथळ जीवशास्त्रीय प्राध्यापिका उपस्थित होत्या. गणेशमूर्ती वितरणानंतर विजयमाला पुढे म्हणाल्या की, सद्य:स्थितीत देशाची वाढती लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने वाढत्या उद्योगधंद्यामुळे भयंकर वायू व जलप्रदूषण निर्माण झाले आहे. प्लाॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे पाण्यामध्ये होणारे विसर्जन हे त्यामागील एक कारण आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्ती कित्येक महिने.पाण्यात विरघळत नाहीत. ज्या ठिकाणी या मूर्तीचे विसर्जन होते त्या ठिकाणीं पाणी आटल्यानंतर मूर्तींचे भंगलेले अवशेष इतस्तहा विखुरलेले दिसतात. ही मूर्तींची विटंबना नाही का, असा प्रश्न करतानाच यापुढे होणारे जलप्रदूषण आणि मूर्तींची विटंबना कटाक्षाने टाळण्यासाठी शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तींचे आम्हा सर्वांना स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माधवी मुलगे, रुख्मिना पवार, मदन चौधरी, गजानन पुरी, अंजली शिकत, रक्षा मुलगे, आदींनी परिश्रम घेतले.