Disagreement within parties, candidates' headaches increased! | पक्षांंतर्गत नाराजीनाट्य, उमेदवारांची वाढली डोकेदुखी!

पक्षांंतर्गत नाराजीनाट्य, उमेदवारांची वाढली डोकेदुखी!

- सुनील काकडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधानसभा निवडणूक अवघ्या ८ दिवसांवर आली असताना राजकीय पक्षांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मानापमानावरून नाराजीनाट्य उफाळून आले आहे. याशिवाय वाशिममध्ये शिवसेनेतून उघड; तर अन्य मतदारसंघांमध्ये छुप्या पद्धतीने बंडखोरीला उधाण आले असून त्याचा सर्वाधिक फटका रिसोडात सेना, वाशिमात भाजपा आणि कारंजा मतदारसंघात रा.काँ.ला बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
राजकीय क्षेत्रातील दिग्गज तथा मातब्बरांचे वर्चस्व पणाला लागलेल्या यंदाच्या विधानसभा निवडणूकीत आता खऱ्याअर्थाने रंग चढत असल्याचे दिसून येत आहे. वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघात तीनवेळा आमदार राहून यंदा चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपा उमेदवारासमोर महायुतीचा धर्म गुंडाळून ठेवत शिवसेनेच्या अपक्ष बंडखोर उमेदवाराने दंड थोपटले आहेत. सेनेच्या या उमेदवाराला विद्यमान जिल्हाध्यक्षांसह खासदारांची व सेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची साथ असल्याचे गत काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींवरून स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. म्हणूनच की काय दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १२ आॅक्टोबरला वाशिममध्ये प्रचारसभा घ्यावी लागल्याची चर्चा आता होत आहे. महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्धार करून भाजपाच्या विरोधात लढणाºया बंडखोरांना व त्यांना साथ देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी या सभेत भरला; पण त्याचा निवडणूकीच्या तोंडावर विशेष फरक पडणार नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
वाशिम मतदारसंघात भाजपा-शिवसेनेत पडलेली उभी फूट रिसोड मतदारसंघावर परिणाम करणारी ठरत आहे. वाशिममध्ये शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्याने रिसोड मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारास साथ द्यायला तेथील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तयार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारंजा लाड मतदारसंघात मात्र नेमकी उलटी परिस्थिती असून शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा उमेदवारासोबत राहून प्रचारकार्यात सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावरून सेना-भाजपातील अंतर्गत वादाचा जबर फटका रिसोडात शिवसेनेला; तर वाशिममध्ये भाजपाला बसणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत रिसोडमधून अनंतराव देशमुख यांचा अपवाद वगळता अन्य दोन मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा प्रकार घडलेला नाही; मात्र वाशिममध्ये स्थानिकच्या अनेक पात्र उमेदवारांना डावलून बाहेरच्या उमेदवारास बहाल केलेली उमेदवारी आणि कारंजात ऐनवेळी पक्षात अवतरलेल्या उमेदवारास राष्ट्रवादीने आपलेसे करून उमेदवारी दिल्याचा प्रकार दोन्ही पक्षांमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. याच स्वरूपातील पक्षांतर्गत धोरणाला कंटाळून कारंजा-मानोरा मतदारसंघात काँग्रेस-रा.काँ.ला सोडचिठ्ठी देऊन अनेक पदाधिकाºयांनी इतर प्रमुख पक्षात प्रवेश घेऊन नाराजी असल्याचे दाखवून दिले आहे. यामुळे वाशिम मतदारसंघात काँंग्रेसला; तर कारंजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँंग्रेसला यंदाच्या निवडणूकीत जबर फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांमधून वर्तविण्यात येत आहे.


मुख्यमंत्र्यांच्या सभेत दिसली नाही शिवसेना; रिसोडातील आदित्य ठाकरेंच्या सभेकडे मतदारांचे लक्ष!
वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपा-शिवसेनेत तेढ निर्माण झालेली असताना भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, १२ आॅक्टोबर रोजी वाशिम येथे सभा घेतली. त्यात महायुतीमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी, जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी यांच्यासह अन्य कुठलाच पदाधिकारी मंचावर दिसून आला नाही. महायुतीमधील बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा दम याच सभेत मुख्यमंत्र्यांनी भरला. दरम्यान, सोमवारी शिवसेना उमेदवाराच्या प्रचारार्थ रिसोडमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा होऊ घातली आहे. त्या सभेच्या मंचावर भाजपाचे नेते, पदाधिकारी दिसतील का, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


यंदाची विधानसभा निवडणूक अनेकांसाठी वर्चस्वाची लढाई!
यंदाच्या विधानसभा निवडणूकीत तीनही मतदारसंघांमधून दिग्गज, मातब्बर तथा राजकीय क्षेत्रात बºयाच वर्षांपासून स्थिरावलेली मंडळी उमेदवार म्हणून उतरली आहे. त्यातील अनेकांसाठी ही निवडणूक म्हणजे जणू वर्चस्वाची लढाई ठरली आहे. वाशिम मतदारसंघात १९९०, २००९ आणि २०१४ अशा तीनवेळा मतदारांनी आमदार म्हणून स्विकारलेल्या लखन मलिक यांनी पुन्हा एकवेळ निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यांच्यासमोर सेनेच्या अपक्ष बंडखोर उमेदवाराने आव्हान उभे केले असून इतरही पक्षांनी मलिकांची डोकेदुखी वाढविली आहे. कारंजातून प्रकाश डहाके हे शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी राष्ट्रवादीत घरवापसी करून निवडणूक लढवत आहेत. रिसोडातून काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. यासह कारंजातून आमदार राजेंद्र पाटणी, रिसोडातून आमदार अमीत झनक या सर्व दिग्गजांनी निवडणूकीत यशस्वी होण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे.

शिवसेनेने नेहमीच युतीधर्म पाळून वाशिम मतदारसंघात भाजपाला साथ दिली. यंदा मात्र भाजपाने थांबून शिवसेनेला साथ देऊन निवडणूक लढण्याची संधी द्यायला हवी होती; मात्र तसे न झाल्यानेच शिवसैनिकांच्या आग्रहाखातर निवडणूक रिंगणात उतरलेले शिवसेनेचे शशीकांत पेंढारकर यांच्या पाठीशी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उभे ठाकले आहेत.
- सुरेश मापारी
जिल्हाध्यक्ष, शिवसेना

Web Title: Disagreement within parties, candidates' headaches increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.