जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चार पदांसाठी थेट लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:24 IST2021-02-13T16:24:08+5:302021-02-13T16:24:28+5:30
Akola District Central cooperative Bank जिल्ह्यातील चार पदांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, थेट लढतीमुळे सहकार क्षेत्र ढवळून निघत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चार पदांसाठी थेट लढत
वाशिम : दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुकानिहाय सेवा सहकारी संस्थांच्या मतदारसंघात जिल्ह्यातील चार पदांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, थेट लढतीमुळे सहकार क्षेत्र ढवळून निघत आहे.
दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा विहित कालावधी संपुष्टात आल्याने निवडणूक होत आहे. मालेगाव, वाशिम, कारंजा व मानोरा या चार तालुकानिहाय सेवा सहकारी संस्थांच्या मतदारसंघात चारही विद्यमान संचालकांसमोर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केल्याने सहकार क्षेत्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. मालेगावमधून विद्यमान संचालक दिलीपराव जाधव यांची थेट लढत बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील कुटे यांच्याशी होत आहे. वाशिम येथे विद्यमान संचालक माधवराव काकडे व बाजार समितीचे माजी सभापती भागवतराव कोल्हे यांच्यात लढत होत आहे. कारंजा येथे विद्यमान संचालक श्रीधर पाटील कानकिरड व विजय पाटील काळे यांच्यात थेट लढत होत आहे. मानोरा येथे विद्यमान संचालक उमेश ठाकरे, बाजार समिती संचालक तुषार पाटील इंगोले, बँकेचे माजी संचालक सुरेश पाटील गावंडे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ग्रामपंचायतींची निवडणुक नुकतीच संपली असून, आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदांसाठी निवडणूक होत असल्याने राजकारण पुन्हा शिगेला पोहचत असल्याचे दिसून येते. सहकार क्षेत्रातील या निवडणुकीमुळे विद्यमान संचालकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.