‘ती’ डायरी उलगडणार ‘कारनामे’
By Admin | Updated: March 13, 2016 01:50 IST2016-03-13T01:50:03+5:302016-03-13T01:50:03+5:30
ग्रामसेवक आत्महत्या प्रकरण; शिक्षकासह दोघांना अटक.

‘ती’ डायरी उलगडणार ‘कारनामे’
धनंजय कपाले / वाशिम
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत कर्तव्यावर असलेले ग्रामसेवक संजय शेळके यांनी ७ मार्चला आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या 'डायरी'मध्ये वरिष्ठ अधिकार्यांनी व पदाधिकार्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी भाग पाडल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मैराळ डोह येथे संजय शेळके ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. शेळके यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये विस्तार अधिकारी कैलास घुगे व यादव पळसकर यांच्यासह आणखी काही अधिकार्यांचा त्रास असल्याने आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते. शेळके यांनी त्यांच्या घरी असलेल्या डायरीमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी अधिकारी व लोकप्रतिनिधींचे अनेक ह्यकारनामेह्ण स्वहस्ताक्षरात लिहून ठेवल्याची माहिती आहे. सदर डायरी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यानुसार तपास सुरू आहे. त्या डायरीमध्ये जामखेड येथील विकास कामामध्ये अनियमितता असल्यावरही तत्कालीन गट विकास अधिकारी (अटक न झाल्याने नाव लिहिले नाही) यांच्यासह शिक्षक गोवर्धन कांबळे व गजानन लोखंडे हे जबरदस्तीने सह्या घेत असल्याचा खळबळजनक आरोप डायरीमध्ये केला आहे. गजानन लोखंडे व गोवर्धन कांबळे या दोघांनी २ लाख रुपये घेतल्याचेही डायरीमध्ये नमूद केले आहे. या डायरीमध्ये लोकप्रतिनिधींनीही असह्य त्रास देऊन जामखेड अंतर्गत न केलेल्या विकासकामाचाही उल्लेख करून जबरदस्तीने सह्या घेतल्या. शेळके यांच्यावर वारंवार दबाव आणून सहीचा वापर करून घेतला. एवढेच नव्हे तर शेळके यांच्या सह्याच्या आधारावर मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचेही अधोरेखित होत आहे. ग्रामसेवक शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणाने मालेगाव पंचायत समिती अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी ह्यतीह्ण डायरी महत्त्वपूर्ण ठरली आहे. शेळके यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केवळ अधिकारी व पदाधिकार्यांच्या त्रासाचाच उल्लेख न करता त्यांच्याकडे असलेले रेकॉर्ड कुठे ठेवले आहे ? याचा सुद्धा उल्लेख करण्यास विसरले नाही. प्रशासनाला रेकॉर्ड शोधण्यासाठी त्रास होणार नाही, याची संपूर्ण खबरदारी घेऊन प्रत्येक रेकॉर्डची माहिती डायरीमध्ये नमुद केली आहे. शेळके यांना त्रास देणारे अधिकारी व पदाधिकारी यांना आपण अपराधी असल्याची कुणकुण लागल्याने हे सर्व सद्यस्थितीत भूमिगत झाले आहेत.