आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे धरणे आंदोलन
By नंदकिशोर नारे | Updated: October 20, 2023 15:19 IST2023-10-20T15:18:21+5:302023-10-20T15:19:42+5:30
कोरोना काळात आपली सेवा प्रदान करणाऱ्या आशा गटप्रवर्तक ह्या रस्त्यावर बाहेर कोणीही नसताना त्यांनी आपली जीव धोक्यात घालून सेवा प्रदान केली.

आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे धरणे आंदोलन
वाशिम : कंत्राटी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी, वार्षिक वेतन वाढ व अनुभव बोनस गटप्रवर्तकांना लागू करावा. गटप्रवर्तकांचे प्रश्न सोडविण्याकरिता कृती समितीला चर्चेसाठी वेळ मिळावा यासह अन्य मुद्द्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन केले जात आहे. या अनुषंगाने रिसोड येथील सेनगाव मार्गावरील ग्रामीण रुग्णालयासमोर आशा गटप्रवर्तक कर्मचारी यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
कोरोना काळात आपली सेवा प्रदान करणाऱ्या आशा गटप्रवर्तक ह्या रस्त्यावर बाहेर कोणीही नसताना त्यांनी आपली जीव धोक्यात घालून सेवा प्रदान केली. अधिकारी व मोठे कर्मचारी हे कार्यालयामध्ये बसून आदेश देण्याचे काम केले. त्यावेळी जीवाची परवा न करता नागरिकांसाठी आशा गटप्रवर्तक झटल्याचे सर्वांनाच माहित आहे .मात्र यांचे सोबतच अन्याय होत असल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. आंदोलनकर्त्या आशा गटप्रवर्तकांच्या मागणीनुसार गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करावे. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही, तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ ५ टक्के व अनुभव बोनस १५ टक्के गटप्रवर्तकांना सुद्धा लागू करून ऑक्टोबर २०२० पासून मागील फरकासहित थकबाकी देण्यात यावी. याखेरीज गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा आदि मागण्यांसाठी सदर आंदोलन सुरू आहे.