वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गोरसेनेचा मोर्चा
By Admin | Updated: August 14, 2014 02:05 IST2014-08-14T01:46:52+5:302014-08-14T02:05:54+5:30
विविध प्रलंबित मागण्यांचे जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन.

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला गोरसेनेचा मोर्चा
वाशिम : बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पारंपारिक पोषाखात, थाळी, नगारा व डफडे वाजवित काढण्यात आलेला गोरसेवेचा मोर्चा १३ ऑगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून गोरसेनेच्या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. जिल्हय़ातील १८३ तांड्यातील बंजारा समाज बांधव व भगिनींनी मोठय़ा संख्येत पारंपारिक पोषाख घालून मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. आंबेडकर चौकातून निघालेला सदर मोर्चा पोलीस स्टेशन, बसस्थानक, सिव्हील लाईन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण भारतातील नउ कोटी बंजारा समाजासाठी तिसरी सुची निर्माण करण्यात यावी या प्रमुख मागणीसह क्रिमीलेरची जाचक अट रद्द करण्यात यावी, बंजारा तांड्याना थेट गाव, शहर व बाजारपेठांना जोडण्यासाठी पक्के रस्ते करण्यात यावे, तांडा तिथे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध कराव्या, तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सांडपाणी व्यवस्था, कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रत्येक तांड्याला स्मशानभूमी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, तालुकास्तरावर बंजारा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन केंद्र, उसतोड कामगारांसाठी अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद, गोर बंजारा समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न, शासकीय नोकरी व बढतीमध्ये सवलत, राजकीय आरक्षण तसेच वसंतराव नाईक महामंडळास योग्य प्रमाणात आर्थिक तरतुद आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चा काढण्यात आला होता. गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.