उमेदवारांचा दैनंदिन निवडणूक खर्चाच्या तपशीलाला ठेंगा
By Admin | Updated: February 27, 2015 01:03 IST2015-02-27T01:03:33+5:302015-02-27T01:03:33+5:30
वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणूक; ६0 उमेदवार रिंगणात.

उमेदवारांचा दैनंदिन निवडणूक खर्चाच्या तपशीलाला ठेंगा
नंदकिशोर नारे/ वाशिम: येत्या १ मार्च रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था निवडणकीचे वारे जोरात वाहत असून सर्वच आघाडींचे उमेदवारासह कार्यकर्ते कामाला भिडले आहेत. निवडणूक लढविणार्या उमेदवाराने निवडणुकीसाठी झालेल्या खर्चाचा दैनंदिन तपशील सादर करणे बंधनकारक असतांना निवडणुक रिंगणात असलेल्या एकाही उमेदवारांच्यावतिने २५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्यात आला नाही. जि.प.वाशिम जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था वाशिम र.जि. रं.३0९ निवडणुकीसाठी ३१ जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. २ फेब्रुवारीला अर्ज छानणीनंतर ३ फेब्रुवारीपासून जे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत त्यांनी दैनंदिन खर्चाचा तपशिल सादर करावयाचा होता. मात्र एकाही उमेदवाराने तो सादर केला नसल्याचे जिल्हा निबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीवरून दिसून येते. ११ संचालक पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीत तब्बल ६0 जण आपले भाग्य अजमावितांना दिसून येत आहेत. यामध्ये खुल्या वर्गासाठी ३५, एस.सी. ६, महिला १0, व्हिजेएनटी ३ व ओबीसीचे एकूण ६ असे ६0 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये क्रांती पॅनल, सहकार पॅनल, बहुजन आघाडी, शिक्षण आघाडी, साने गुरूजी-परिवर्तन पॅनल, संघ पॅनल निवडणुकीत सहभागी आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६0 चे कलम ७३ कब व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २0१४ चे नियम ६५ व राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास सर्मथ करणार्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून सहकारी संस्थांच्या समितीची निवडणूक लढविणार्या प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीमध्ये करावयाच्या खर्चाची कमाल र्मयादा र्मयादा १ लाख रूपये आहे. उमेदवाराने निवडणुकीसाठी झालेला खर्चाचा दैनंदिन तपशील सादर करणे बंधनकारक असताना २५ फेब्रुवारीपर्यंत एकाही उमेदवाराने दाखल केला नाही. यासंदर्भात जिल्हा निबंधक कार्यालयाशी संपर्क साधला असता ज्या उमेदवारांनी खर्च सादर केला नाही अशा उमेदवारांवर कारवाई केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.