गारपिटीमुळे नुकसान भरपाईसाठी ६.८४ कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 13:03 IST2021-04-06T13:03:04+5:302021-04-06T13:03:28+5:30
Washim News : नुकसान भरपाईसाठी ६ कोटी ८४ लाख ४१ हजार ७६० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.

गारपिटीमुळे नुकसान भरपाईसाठी ६.८४ कोटींची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात मार्च २०२१ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ५०४९ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाच्या धामधुमीतही महसूल विभागाने ३१ मार्चअखेर नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण केली असून नुकसान भरपाईसाठी ६ कोटी ८४ लाख ४१ हजार ७६० रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. तसा अहवाल ५ एप्रिल रोजी सादर करण्यात आला.
मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन वाशिम तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३५ गावांमध्ये १९८९ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, गहू, हरभरा, मूग, ज्वारी, तीळ, भूईमुग, मका, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
मालेगाव तालुक्यातील ६ महसुली मंडळातील ३८ गावांमध्ये १६९५ हेक्टर, रिसोड तालुक्यातील ३ महसुली मंडळातील २३ गावांमध्ये ५१९ हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यातील २ महसुली मंडळातील १६ गावांमध्ये २७४ हेक्टर, मानोरा व कारंजा तालुक्यातील ९ महसुली मंडळांतील २५ गावांमध्ये ५०६ हेक्टर क्षेत्र यामुळे बाधित झाले.
दरम्यान, या पिकांसाठी १३ मे रोजी पारित झालेल्या शासन निर्णयानुसार प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये मदत देय आहे. त्यानुषंगाने ६ कोटी ७३ लाख १० हजार ४६० रुपये मदतनिधीची गरज आहे.
यासह ६३ हेक्टरवर नुकसान झालेल्या संत्रा, लिंबू आणि आंबा या पिकांकरिता १८ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे ११ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मदतनिधी आवश्यक आहे. तशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदविली आहे.
(प्रतिनिधी)