बाजारपेठेत गर्दी न करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता नियंत्रणात आहे; मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे. बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
जुने शहरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिममधील जुने शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचालकांची गैरसोय होत आहे. स्थानिक नगरपालिकेने या समस्येकडे लक्ष पुरवून अंतर्गत मुख्य रस्त्यांची विनाविलंब दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
बालविवाहासंदर्भात माहिती द्यावी
वाशिम : बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील ७०० गावांमध्ये बाल संरक्षक समिती स्थापन केली. गावात कुठेही बालविवाह होत असल्यास प्रशासनाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले.
मुलांची काळजी घेण्याचा सल्ला
वाशिम : १० वर्षांआतील मुलांना न्यूमोनिया, सर्दी, ताप आदी आजार होत आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांनादेखील कोरोना संसर्ग होण्याचा धोका असून, पालकांनी लहान मुलांना जपावे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला.
मधुमक्षिका पालन करण्याचे आवाहन
वाशिम : मधुमक्षिका पालन व्यवसायातून दारिद्र्यरेषेखालील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालनाकडे वळावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने शनिवारी केले आहे.
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून कारंजा तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली. या वेळी अनेकांनी याचा लाभ घेतला.
रस्त्यासाठी आंदाेलनाचा इशारा
काेंडाेली : येथील वाॅर्ड नं. १ मधील नवीन लेआउटमधील मुख्य रस्ता मोकळा करण्याबाबत आणि चालू असलेला रस्ता आराखड्यानुसार करण्याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला निवेदन दिले. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.