नाशिकच्या अपघातात वाशिम जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर
By संतोष वानखडे | Updated: October 9, 2022 17:33 IST2022-10-09T17:31:38+5:302022-10-09T17:33:23+5:30
वैभव भिलंग हा एकुलता एक मुलगा असून, या दुर्देवी घटनेमुळे भिलंग कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.

नाशिकच्या अपघातात वाशिम जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर
वाशिम - नाशिक शहरातील मिरची हॉटेल चौकात चिंतामणी ट्रॅव्हल्स-आयशर ट्रकच्या भीषण अपघातात रविवारी (दि.९) वाशिम जिल्ह्यातील आणखी तीन मृतकांची ओळख पटली. जिल्ह्यातील मृतकांचा आकडा पाचवर पोहोचला आहे.
शनिवारी तरोडी (ता. मालेगाव) येथील उद्धव पंढरी भिलंग आणि मानोरा तालुक्यातील वसंतनगर पोहरादेवी येथील रहिवासी लक्झरी वाहनाचा चालक ब्रह्मा सोमाजी मनवर या दोन मृतकांची ओळख पटली होती. रविवारी वैभव वामन भिलंग (रा. तरोडी, ता.मालेगाव), साहिल जितेंद्र चंद्रशेखर (रा. सावळी, ता. मालेगाव), अशोक सोपान बनसोड (रा. बेलखेडा, ता. रिसोड) या तीन मृतकांची ओळख पटली. या दुर्घटनेमुळे जनमन हळहळले असून, शोकाकुल वातावरणात रविवारी मृतकांवर अंतिम संस्कार करण्यात आले.
वैभव भिलंग हा एकुलता एक मुलगा असून, या दुर्देवी घटनेमुळे भिलंग कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई वडील, तीन बहिणी आहेत. तिन्ही बहिणींचे लग्न झाले आहे. वैभव हा अविवाहित होता. मोलमजूरी करून वृद्ध आई-वडीलांचा उदरनिर्वाह तो करीत होता.