नदीपात्रात बुडून मृत्यूमुखी घोषित केलेला ‘तो’ वयोवृद्ध ‘जीवंत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:20 IST2018-10-23T18:20:06+5:302018-10-23T18:20:54+5:30
शेलुबाजार (वाशिम) : १० आॅक्टोबर रोजी येथील अडाणनदी पात्रात बुडून ७० वर्षीय वयोवृद्धास, मृतदेह आढळल्यानंतर प्रशासनाने मृत घोषित केले होते. दरम्यान मृत घोषित केलेला सदर वयोवृद्ध इसम २३ आॅक्टोबर रोजी शेलुबाजार येथे दिसताच बघ्यांनी एकच गर्दी केली.

नदीपात्रात बुडून मृत्यूमुखी घोषित केलेला ‘तो’ वयोवृद्ध ‘जीवंत’
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम) : १० आॅक्टोबर रोजी येथील अडाणनदी पात्रात बुडून ७० वर्षीय वयोवृद्धास, मृतदेह आढळल्यानंतर प्रशासनाने मृत घोषित केले होते. दरम्यान मृत घोषित केलेला सदर वयोवृद्ध इसम २३ आॅक्टोबर रोजी शेलुबाजार येथे दिसताच बघ्यांनी एकच गर्दी केली. अधिक चौकशी केली असता नदीपात्रात बुडून मृत्यू झालेला इसम हा दुसराच कुणीतरी असल्याची बाब समोर आली.
१० आॅक्टोबर रोजी एक वृध्द अडाण नदी पात्रात बुडूुन मरण पावल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी रितसर पंचनामा करुन अधिक माहिती घेतली असता, त्या इसमाचे नाव देवराव किसन पानपिते असल्याचे सांगण्यात आले. त्या आधारे जागेवरच शवविच्छेदन आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करुन याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, २३ आॅक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास देवराव पानपिते हे शेलूबाजार येथे दिसताच त्यांना ओळखणाºया नागरिकांनी एकच गर्दी केली. तुम्ही तर नदीपात्रात बुडून मृत्यूमुखी पडले होते, आता जीवंत कसे? असा थेट प्रश्न विचारला असता, मी मागील बºयाच दिवसांपासून कंझरा येथे राखणदारीवर असल्याचे पानपिते यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर निराधार योजनेंतर्गतचे अनुदान आले की नाही हे पाहण्यासाठी पानपिते हे बँकेत गेले असता, तेथेही गर्दी झाली. तुम्ही जीवंत कसे, या प्रश्नाने व्यथित झालेल्या पानपिते यांनी थेट शेलुबाजार पोलीस चौकी गाठत स्वत:चे लाठी येथील रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्डची प्रत दाखविली. यामुळे सर्वच अचंबित झाले असून, नदी पात्रात बुडून मरण पावलेला तो वयोवृद्ध कोण? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. नदीपात्रात बुडून मृत्यू पावलेल्या इसमाचा मृतदेह आढळल्यानंतर अंतिम संस्कारही करण्यात आले. त्यामुळे ‘त्या’ अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.