लग्नाचा बस्ता घेऊन परतणाऱ्या कुटंबावर काळाचा घाला, कार अपघातात बापलेकी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 16:52 IST2021-03-28T16:35:10+5:302021-03-28T16:52:31+5:30
Accident News शनिवारी रात्री झालेल्या अपघातात शेंदुरजना ( जिल्हा बुलढाणा) येथील बापलेकीचा जागेवरच मृत्यू झाला.

लग्नाचा बस्ता घेऊन परतणाऱ्या कुटंबावर काळाचा घाला, कार अपघातात बापलेकी जागीच ठार
शिरपूर जैन: शिवकन्याचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याची मोठ्या हर्षोल्लासात घरी तयारी सुरू होती. लग्नाचे कपडे आणण्यासाठी नववधू, तीची चुलत बहिण कल्याणी व कल्याणीचे वडिल दिनकर शिंगणे हे अन्य काही लोकांसमवेत अमरावतीला गेले. तेथून परत येत असताना भरधाव कंटेनरची कारला जबर धडक लागून कल्याणी व तीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना मालेगाव-मेहकर रस्त्यावरील सरहद पिंपरी गावानजिक शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्हयातील शेंदुरजना येथील दिनकर एकनाथ शिंगणे (४४), त्यांची मुलगी कल्याणी दिनकर शिंगणे (१८) हे अमरावती येथे कुटुंबियांसोबत शिवकन्या शिंगणे हिच्या लग्नाचा बसता घेण्यासाठी गेले होते. अमरावती येथून परत येत असताना शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सरहद पिंपरी येथे त्यांच्या एम. एच. ११ सी. डब्ल्यू ०४३६ या क्रमांकाच्या कारला मेहकरकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्रमांक एम.एच. १७ बी.व्ही. ६४८९) समोरासमोर धडक दिली. या अपघातात दिनकर शिंगणे व कल्याणी शिंगणे या बापलेकीचा जागीच मृत्यू झाला; तर नंदकिशोर शिंगणे, अशोक शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, धनंजय शिंगणे, शिवकन्या शिंगणे व कारचालक योगेश बबन ईधारे हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.