महावितरणच्या "नवप्रकाश"ला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद!
By Admin | Updated: April 18, 2017 19:34 IST2017-04-18T19:34:13+5:302017-04-18T19:34:13+5:30
वाशिम- महावितरणच्या "नवप्रकाश" योजनेला ग्राहकांमधून फारच अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दीपक मेश्राम यांनी मंगळवारी दिली.

महावितरणच्या "नवप्रकाश"ला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद!
वाशिम : विजेची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महावितरणने नवप्रकाश योजना अंमलात आणली असून त्यास जुलै २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे असताना या योजनेला ग्राहकांमधून फारच अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दीपक मेश्राम यांनी मंगळवारी दिली.
वाशिम जिल्ह्यात महावितरणचे २ लाख १९ हजार ५६६ ग्राहक असून घरगुती ग्राहकांची संख्या १ लाख ५२ हजार ८८६ आहे. एप्रिल २०१७ पर्यंत त्यातील ३० हजारपेक्षा अधिक ग्राहकांकडे १७ कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. त्यांनी नवप्रकाश योजनेचा लाभ घेवून देयकातून मुक्त व्हावे, यासाठी महावितरणचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ग्राहकांनी या योजनेकडे सपशेल पाठ फिरवली आहे.
नवप्रकाश योजनेंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना त्यांच्या मूळ देयकाच्या रकमेत ५ टक्के सुट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. वाढलेल्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या घरगुती ग्राहकांसाठीच ही योजना लागू आहे. महावितरणकडून योजनेची प्रभावीरित्या जनजागृती केली जात आहे. एवढेच नव्हे; तर आधी ३० एप्रिल २०१७ पर्यंत ही योजना लागू होती. त्यास जुलै २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याऊपरही योजनेला विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी सांगितले.