जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:47 IST2021-09-14T04:47:58+5:302021-09-14T04:47:58+5:30
संतोष वानखडे वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाचाच आहे, असा महत्त्वपूर्ण ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला!
संतोष वानखडे
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाचाच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांवरील स्थगिती उठविली जाऊ शकते, या शक्यतेने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागून आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला होता; परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या ९ जुलैच्या आदेशानुसार पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका निकाली काढताना, कोरोनासंदर्भातील शासनाची अधिसूचना ही निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यापासून रोखू शकत नाही व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा आयोगाचाच आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवार, ११ सप्टेंबरला दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोग कामाला लागले असून, याआधी स्थगित केलेला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी स्थगितीच्या टप्प्यावरून पुढे राबविण्यात येऊ शकतो. कोरोना नियंत्रणात असल्याने आणि न्यायालयीन निर्णय यामुळे आता पोटनिवडणूक अटळ असून, स्थगिती केव्हा उठविली जाते याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
.....................
इच्छुक उमेदवार लागले कामाला!
पोटनिवडणूक अटळ असल्याची शक्यता लक्षात घेऊन, उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुन्हा एकदा प्रचारकार्यात सक्रिय झाले आहेत. येत्या आठवड्यातच स्थगिती उठविली जाण्याची दाट शक्यता असल्याने प्रचारयंत्रणा सज्ज ठेवण्याला उमेदवारांकडून सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. सर्कलमधील त्या-त्या गावांतील प्रमुख समर्थक, हितचिंतकांकडून आढावा घेत मतांची गोळाबेरीज जुळविण्यात उमेदवार व्यस्त होत असल्याचे दिसून येते.
.............
पोटनिवडणूक होणारे एकूण गट १४
पोटनिवडणूक होणारे एकूण गण २७
....................
राजकारण पुन्हा तापतेय!
घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपावरून शिवसेना-भाजपतील राजकारण अगोदरच तापलेले आहे. त्यातच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तर सेना, भाजप उमेदवारांमधील लढती लक्षवेधक ठरण्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागली आहे. प्रचारकार्यात आणखी रंगत येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोटनिवडणुकीत कोण कुणाला पराभूत करतो, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
.....................
असे आहेत जिल्हा परिषदेचे गट
काटा, पार्डी टकमोर, उकळी पेन, पांगरी नवघरे, कवठा खुर्द, गोभणी, भर जहागीर, दाभा, कंझरा, आसेगाव, भामदेवी, कुपटा, तळप बु., फुलउमरी