‘सीटी स्कॅन’ मशिन कार्यान्वित; रुग्ण तपासणीकडे कानाडोळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 15:23 IST2020-02-18T15:22:56+5:302020-02-18T15:23:05+5:30
गत महिनाभरात केवळ १० रुग्णांचे ‘सीटी स्कॅन’ करण्यात आले.

‘सीटी स्कॅन’ मशिन कार्यान्वित; रुग्ण तपासणीकडे कानाडोळा!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : किरकोळ बाबीवरून आठ महिने धुळखात पडलेली जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन १४ जानेवारीला रुग्णसेवेत आली खरी; परंतू एका महिन्याच्या कालावधीत केवळ १० रुग्णांना याचा लाभ झाला. यावरून गोरगरीब रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यासंदर्भात आरोग्य विभागाचे धोरण उदासीन असल्याचे दिसून येते.
गोरगरीब रूग्णांना आरोग्यविषयक सेवा मोफत तसेच माफत दरात उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागातर्फे सरकारी रुग्णालयाची निर्मिती केली जाते. वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात साधारणत: १० महिन्यांपूर्वी सात कोटी रुपये किंमत असलेली सीटी स्कॅन मशिन प्राप्त झाली होती. परंतू, विद्युत विषयक कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने ही मशिन पाच महिने धूळ खात पडली होती. यासंदर्भात ‘लोकमत‘ने वृत्तही प्रकाशित केले होते. विद्युतविषयक कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जवळपास ७.५० लाखांचा निधी जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळाला. त्यानंतर विद्युतविषयक कामे पुर्णत्वाकडे जाण्यास दिरंगाई झाल्याने सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित झाली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून महावितरण व आरोग्य विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत संबंधित यंत्रणेने १४ जानेवारी रोजी सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित केली. परंतू, यासंदर्भात कोणतीही जनजागृती नसल्याने गरजू रुग्णांना या सीटी स्कॅन मशिनचा म्हणावा तेवढा फायदा मिळत नसल्याचा दावा रुग्ण व नातेवाईकांनी केला. गत महिनाभरात केवळ १० रुग्णांचे ‘सीटी स्कॅन’ करण्यात आले. जाचक अटी सांगून गरजू रुग्णांना खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्लाही दिला जातो. यामुळे रुग्णांना आर्थिक झळ बसते. सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित झाल्यासंदर्भात तसेच यासाठी पात्र लाभार्थी कोण यासंदर्भात जनजागृती व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य चरण गोटे यांनी सोमवारी केली
जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन प्राप्त झालेली आहे. मध्यंतरी थ्री फेज जोडणी व अन्य विद्युतविषयक कामाअभावी सीटी स्कॅन मशिन कार्यान्वित झाली नव्हती. १४ जानेवारीपासून ही मशिन कार्यान्वित झाली आहे. पात्र रुग्णांची सीटी स्कॅन तपासणी करण्याच्या सूचना सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आतापर्यंत निश्चित किती रुग्णांना या सिटी स्कॅनचा लाभ झाला, सांगता येऊ शकणार नाही.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम