बॅंकांसमोरची गर्दी हटेना; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:27 IST2021-05-17T14:26:42+5:302021-05-17T14:27:19+5:30
Washim News : सोमवारी बँका उघडल्यानंतर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

बॅंकांसमोरची गर्दी हटेना; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम : तीन दिवसाच्या सुटीनंतर जिल्ह्यातील बँकांमध्ये सोमवार, १७ मे रोजी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. बँकांमधील गर्दीच्या या उच्चांकाने कोरोना निच्चांकी पातळीवर कसा येईल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे नियोजन कोलमडल्याने कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येते.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकेत तसेच बँकांसमोर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तथापि, गर्दी कमी होत नसल्याचे पाहून ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देताना त्यांच्या खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकानुसार दिवस ठरवून देण्यात आले आहेत. याऊपरही गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात २० मे पर्यंत कडक निर्बंध असून, यामध्ये बँकांना सूट देण्यात आली आहे. खरीप हंगाम जवळ येत असल्याने तसेच पीएम किसान योजनेंतर्गतचे दोन हजार रुपये काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. मागील सलग तीन दिवसांपासून बँका बंद असल्याने सोमवारी वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर, मानोरा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. बँकांमधील आर्थिक व्यवहार हा महत्वाचा आहेच; परंतू बँकांमधील गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेणेही आवश्यक ठरत आहे.
ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग !
बँकांमध्ये तसेच बँकांसमोर प्रचंड गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. अनेकजण मास्कचा वापरही करीत नसल्याचे सोमवारी दिसून आले. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी कशी तुटणार? असा प्रश्न कायम आहे. बँकांमधील गर्दीमुळे कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येते.