शेकडो हेक्टरवरील पिकांना मिळाली नवसंजीवनी

By Admin | Updated: August 23, 2014 02:11 IST2014-08-23T00:59:25+5:302014-08-23T02:11:09+5:30

कारंजालाड सह रिसोड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस.

Crops received on hundreds of hectares of Navsanjivani | शेकडो हेक्टरवरील पिकांना मिळाली नवसंजीवनी

शेकडो हेक्टरवरील पिकांना मिळाली नवसंजीवनी

कारंजालाड : विजेच्या प्रचंड कडकडाटात प्रतीक्षेतील पावसाचे शुक्रवारी तासभर दमदार आगमन झाल्याने परिसरातील शेकडो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे.
सायंकाळी ५ वाजतापासून आकाशात मेघांनी गर्दी केली होती. लगेचच शहराच्या काही परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यास सुरूवात झाली; मात्र त्यानंतर थोडावेळ उसंत घेतल्यानंतर ६.३0 पासून विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी ७ पासून दमदार पावसाला सुरुवात झाली. किमान एक तासभर दमदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या व सर्वसामान्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले आहे.
पावसाच्या लपंडावामुळे शहर परिसरातील शेकडो एकरावरील पिके धोक्यात आली होती. सोयाबीन पिकाने माना टाकायला सुरुवात केली होती. अवर्षणामुळे बाजारपेठेतही मंदीचे सावट पसरल्याने पावसासाठी नागरिक देवाला साकडे घालत होते. शुक्रवारी आलेल्या पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. या पावसामुळे बाजारपेठेतील रेलचेल वाढण्याची शक्यता आहे. वृत्त लिहेपर्यंत शहरात रिमझिम पाऊस सुरूच होता.
कामरगाव येथे वादळी वार्‍यासह पाऊस आल्याने ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. जलालपूर येथील शेतकरी दादाराव गावंडे यांच्या घराजवळील जुने झाड तुटून गोठय़ावर पडल्याने त्यांचा बैल गंभीर जखमी झाला. याचा तलाठी व सरपंच साहेबराव तुमसरे यांनी पाहणी करून पंचनामा केला. शेतकर्‍याने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
मानोरा शहरातही २२ ऑगस्टच्या सायंकाळी ६.३0 च्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. कारंजा तालुक्यातील पिकाप्रमाणे मानोरा तालुक्यातील पिकांनीही पाण्याअभावी माना टाकल्या होत्या.
शुक्रवारी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील मरणासन्न झालेले पीक पुन्हा डोलू लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Crops received on hundreds of hectares of Navsanjivani