कापूस खरेदी मातीमोल भावात
By Admin | Updated: November 9, 2014 01:12 IST2014-11-09T01:12:21+5:302014-11-09T01:12:21+5:30
जिल्हय़ात कापसाचा पेरा नगण्य : वाशिम, रिसोड व मानोरा तालुक्यात कापसाचा पेरा अत्यल्प.

कापूस खरेदी मातीमोल भावात
नंदकिशोर नारे / वाशिम
अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांची वाट लागल्यानंतर शेतकर्यांच्या आशा तूर आणि कापूस पिकांवर आहेत. अनेक शेतकर्यांनी जेमतेम उत्पादन झालेल्या कापसाची वेचणीही उरकली; कापसाच्या शासकीय खरेदीला वेळ असल्याने व्यापार्याच्या दारात शेतकरी कापूस मातीमोल भावात विकत आहे. कापसाचे उत्पादन आधीच कमी असताना खासगी बाजारात कापसाला प्रती क्विंटल चार हजारांच्या आतच भाव मिळत असल्याने आर्थिक विंवचनेत सापडलेले शेतकरी कापसाच्या शासकीय खरेदीची आतुरतेने प्रतीक्षा क रीत आहेत. गतवर्षी अतवृष्टीने अडचणीत आलेल्या शेतकर्यांना यंदा अपुर्या पावसाने फटका बसला. मूग, उडीद ही पिके दिसलीच नाही, तर सोयाबीनचे उत्पादनही खर्व भरून काढू शकले नाही. मानोरा तालुक्यात यंदा दुबार, तिबार पेरणीच्या संकटाचा सामना करणार्या अनेक शेतकर्यांनी मूग, उडीद पिकांची वेळ निघून गेल्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीचा आधार घेतला होता. त्यातच पावसाअभावी सोयाबीननंतर कपाशीच्या उत्पादनातही कमालीची घट आली. सोयाबीनचे एकरी क्विंटल उत्पादनही न झाल्यामुळे अनेक शेतकर्यांवर रडण्याचीच वेळ आली. कपाशीचे उत्पादनही घटले आणि त्यातच व्यापार्यांकडून शेतकर्यांना कापसाचा चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अवर्षणामुळे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनच्या विक्रीत पेरणीचा खर्चही निघाला नाही आणि आता कापसाचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात नाही आणि बाजारपेठेत भावही नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कापसाच्या शासकीय खरेदीची प्रतीक्षा करीत आहेत. शासनाने कापसाच्या खरेदीची सुरुवात करून चांगले भाव द्यावे, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. शासनाकडून कापसाचे हमीभाव प्रती क्विंटल ४ हजार ३६0 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. त्यातच शासकीय कापूस संकलन केंद्रावर कापसाची विक्री केल्यास शेतकर्यांना टप्प्याटप्प्याने त्याचा चुकारा मिळतो; परंतु शेतकर्यांना हक्काची बाजारपेठही मिळते. सद्यस्थितीत कापसाची शासकीय खरेदी सुरू झालेली नाही. त्यातच सोयाबीनच्या विक्रीतून पेरणीचा खर्चही वसूल न झाल्यामुळे शेतकर्यांना नाइलाजास्तव व्यापार्यांकडेच कापसाची विक्री करावी लागत आहे. मंगरूळपीर व मानोरा येथेच केवळ व्यापार्याकडून कापसाची खरेदी होत असून, मानोरा व मंगरूळपीर येथे ५५0 क्विंटलच्या जवळपास कापसाची खरेदी करण्यात आली आहे.