कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारातही भ्रष्टाचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:50+5:302021-06-05T04:28:50+5:30

वाशिम : प्रशासकीय यंत्रणेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. कुठल्याही कामाची फाइल बाबूला चिरीमिरी दिल्याशिवाय पुढे सरकत नाही, हे अनेकवेळा ...

Corruption in the funeral of those killed by Corona? | कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारातही भ्रष्टाचार?

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारातही भ्रष्टाचार?

वाशिम : प्रशासकीय यंत्रणेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. कुठल्याही कामाची फाइल बाबूला चिरीमिरी दिल्याशिवाय पुढे सरकत नाही, हे अनेकवेळा सिद्ध झाले; मात्र मृतकांच्या अंत्यसंस्कारावर खर्च केल्या जाणाऱ्या रकमेतही भ्रष्टाचार होत असेल तर..? पैशापुढे माणुसकीही गहाण ठेवायला मागेपुढे न पाहणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील काही ठगांनी हा प्रताप केला आहे. कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या प्रत्येकी एका व्यक्तीवर जास्तीत जास्त तीन हजारांचा खर्च होत असताना पाच ते साडेपाच हजारांचा खर्च दाखवून लाखोंची रक्कम डकार न देता घशात उतरविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोना संसर्गाने बाधित पहिला व्यक्ती आढळला होता. तेव्हापासून आजतागायत कोरोना विषाणू संसर्गाचे संकट जिल्ह्यात ठाण मांडून आहे. संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिभयंकर ठरली. पहिल्या लाटेत ७३३९, तर १५ फेब्रुवारी ते ३ जून या कालावधीत ३३ हजार १४ नागरिक संसर्गाने बाधित झाले. पहिल्या लाटेत १५६ आणि दुसऱ्या लाटेत ४३१ अशा एकंदरीत ५८७ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाने कुठल्याही व्यक्तीचा शासकीय अथवा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता प्लॅस्टिक पिशवीत पॅक करून मृतदेहावर स्थानिक नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी लागणाऱ्या पाच पीपीई किट जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून उपलब्ध करून दिल्या जातात, तर मृतदेह जाळण्याकरिता लागणारे लाकूड, गोवऱ्या आणि डिझेलचा खर्च करण्याची जबाबदारी नगरपालिकांकडे सोपविण्यात आलेली आहे. त्यातच लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब प्रथमदर्शनी उघड होत आहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात सखोल चाैकशी करण्याची गरज असल्याचा सूर सर्वच स्तरातून उमटत आहे.

...

वाशिममध्ये ५५४ मृतदेहांना चिताग्नी

जिल्ह्यातील वाशिम नगरपालिकेने गेल्या वर्षभरात कोरोनाने मृत्यू झालेल्या ५५४ व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले असून, त्यातील ३६१ मृत्यू शासकीय रुग्णालयात, तर १९३ मृत्यू खासगी दवाखान्यांमध्ये झालेले आहेत. नगरपालिकेने प्रत्येकी एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारावर पाच ते साडेपाच हजारांचा खर्च झाल्याचे दर्शविले आहे. प्रत्यक्षात एका मृतदेहास चिताग्नी देण्याकरिता लागणारा खर्च हा जास्तीत जास्त तीन हजारांपेक्षा अधिक होत नाही. त्यामुळे उर्वरित दोन ते अडीच हजारांचे नेमके काय झाले, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

..................

एका मृतदेहावरील अंत्यसंस्काराचा खर्च

५०० रुपये प्रतिक्विंटल दराने चार क्विंटल लाकूड - २०००

६०० रुपये दराने दोन सर्जिकल पीपीई किट - १२००

प्रतिगोवरी दोन रुपये दराने २०० गोवऱ्या - ४००

९३ रुपये प्रतिलिटर दराने पाच लिटर डिझेल - ४६५

एकूण खर्च - ४,०६५ रुपये

.....................

४०,३५३

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित

३८,१७२

बरे झालेले रुग्ण

३६१

शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू

२२६

शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यू

५८७

कोरोनाने झालेले एकूण मृत्यू

.................

कोट :

गत वर्षभरात वाशिम नगरपालिकेने कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या ५५४ व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यासाठी प्रतिव्यक्ती साडेपाच हजार यानुसार ३० लाख ४७ हजारांचा खर्च झालेला आहे. त्यात पीपीई किट, लाकूड, गोवऱ्या आणि डिझेलचा समावेश आहे.

- दीपक मोरे

मुख्याधिकारी, नगरपालिका, वाशिम

....................

वाशिम जिल्ह्यात ३ जूनअखेर कोरोना विषाणू संसर्गाने बाधित एकूण ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ३६१ मृत्यू हे शासकीय रुग्णालयात झाले असून, मृतदेह पॅकिंग करून देण्यासह प्रत्येकी पाच पीपीई किट आरोग्य विभागाने पुरविल्या आहेत.

- डाॅ. मधुकर राठोड

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

..................

गत वर्षभरापासून वाशिम नगरपालिकेच्या मागणीनुसार लाकूड पुरविण्यात येत आहे. कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ५०० रुपये प्रतिक्विंटल या दराने लाकूड पुरविण्यात येते.

- प्रमोद टेकाळे

श्री शारदा साॅ मिल, वाशिम

..................

कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपालिकांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यांच्या फंडातून हा खर्च करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यांनी नियमानुसारच खर्च करणे अपेक्षित आहे. चुकीचा प्रकार झाला असेल तर निश्चितपणे सखोल चाैकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

- शन्मुगराजन एस.

जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Corruption in the funeral of those killed by Corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.